अमरावती - गोड बोलणे हे केवळ मानवी संबंधांमध्ये माधुर्य आणण्याचेच उपयोगी सूत्र नव्हे, तर या गुणामुळे आरोग्यही उत्तम राखता येते, असे गुपित प्रसिद्ध कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अतुल यादगीरे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.डॉ. यादगीरे सांगतात, गोड बोलण्यासाठी अंगी संयम बाळगावा लागेल. संयम बाळगण्यासाठी अनावश्यक रागापासून दूर राहावे लागेल. त्याचा लाभ असा होईल की, रागादरम्यानच्या मनोशारीरिक स्थितीत शरीरात उत्पन्न होणारे हानिकारक स्टेरॉइड्स आणि अॅड्रिनॅलीन हार्मोन्सची गैरजरूरी निर्मिती नियंत्रित होईल. आरोग्य त्यामुळे उत्तम राखले जाईल.हल्ली प्रत्येकाच्या आयुष्यात वाढलेला ताणतणाव आणि ढळलेला संयम ‘सायकोसोमॅटिक’ आजारांना कारणीभूत ठरला आहे. हृदयरोग, मधुमेह, रक्तचाप, कर्करोग, मूळव्याध, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचा परिचय जवळजवळ प्रत्येक शरीराला आहे. गोड बोलणे आणि 'रिअॅक्ट' होण्याऐवजी 'रिस्पॉन्स' (प्रतिक्रिया ऐवजी प्रतिसाद) देणे हे अत्यंत महत्त्वाचे. संतुलित आहार, योग्य व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोण आणि परिपूर्ण विश्रांती या चतु:सूत्रीने अशी जीवनशैली हमखास साधता येईल.डोक्यावर बर्फ आणि ओठांवर साखर ठेवावी म्हणतात, ते खरेच. लहान-लहान कारणांमुळे उडणारे खटके आणि त्यातून अंगात भिनणारा राग हे अनारोग्याचे द्वारच. 'तीळ-गूळ घ्या, गोड गोड बोला' हे भारतीय संस्कृतीतील निकोप आरोग्याचे सूत्र पुनरुज्जीवित होणे वैद्यकीयदृष्ट्याही गरजेचे आहे, असे मत डॉ. अतुल यादगीरे यांनी व्यक्त केले.
गोड वाणी, संयमी वृत्ती आजारमुक्तीची गुरुकिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:35 PM
गोड बोलणे हे केवळ मानवी संबंधांमध्ये माधुर्य आणण्याचेच उपयोगी सूत्र नव्हे, तर या गुणामुळे आरोग्यही उत्तम राखता येते, असे गुपित प्रसिद्ध कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. अतुल यादगीरे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.
ठळक मुद्देडॉ. अतुल यादगीरे : रागात घातक हार्मोन्सची निर्मिती