अमरावती : स्वाईन फ्लू आजाराचा प्रसार होऊ नये व रुग्णांना त्वरित उपचार मिळण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाकडून जिल्ह्याला १० हजार टॅमी फ्लू गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्वाईन फ्लूचे दोन संशयित रुग्ण अमरावतीत आढळून येताच सामान्य रुग्णालय प्रशासन सतर्क झाले. स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी विशेष सुविधा देणाऱ्या कक्षात रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये रुग्णांसाठी टॅमी फ्लू गोळ्या, व्हॅटिलेटर, एन ९५ मास्क, रुग्णवाहिका व स्वॉफ घेऊन जाण्यासाठी एक कर्मचारी अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांनाही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांच्याकरीता १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका प्रत्येक रुग्णालयात सज्ज आहे. (प्रतिनिधी)स्वाईन फ्लूची लक्षणेताप, खोकला, सर्दी, घसा दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, क्वचित प्रसंगी अतिसार व उलटी होणे अशीे लक्षणे स्वाईन फ्लूची असू शकतात. त्यामुळे असे लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवशक आहे. इन्फ्लूएन्झा या विषाणुमुळे होणारा हा आजार एका माणसांपासून दुसऱ्या माणसाला होतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
स्वाईन फ्लू : विशेष रुग्णवाहिकेसह आरोग्य पथक सज्ज
By admin | Published: February 03, 2015 10:45 PM