चांदूर बाजार : तालुक्यात १५ जानेवारीला ४१ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. यात ३८१ जागांसाठी ९१४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या सर्वांना राज्य निवडणूक आयोगाचे नियमानुसार आपला निवडणूक खर्च मुदती तसादर करणे आवश्यक होते. परंतु ८१४ पैकी २८२ उमेदवारांना दिलेल्या मुदतीत खर्च सादर न करण्याचा, परिणाम भोगावा लागण्याची दाट शक्यता आहे. यात १६ निवडून आलेल्या विद्यमान सदस्यांचाही यात समावेश आहे. तसेच २०९ पराभूत व ५७ माघार घेतलेले उमेदवार समावेश आहे. या सर्वांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
१६ विद्यमान सदस्य अपात्र ठरवून त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. उर्वरित २६६ उमेदवार पुढील ग्रा.पं. निवडणुकीसाठी अपात्र ठरू शकतात. तालुक्याच्या निवडणूक विभागातून याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविली आहे. सध्या कोरोनाच्या घाई गर्दीत हा निर्णय पडून आहे. या निवडणुकीत ९२४ पैकी १०१ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. पैकी ४४ उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला आहे. उर्वरित ५७ उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.
या निवडणुकीत ४१ उमेदवार अविरोध निवडून आले होते. तर ३४० जागांसाठी ८१३ उमेदवारांनी आपले भाग्य अजमावले होते. पैकी ४७३ उमेदवार पराभूत झाले होते. यापैकी २०९ उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपला निवडणूक खर्च सादर केला नाही. परिणामी यांचेवरही अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे ३८१ विजयी उमेदवारांमध्ये ३६५ उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला आहे. यातिल १६ विजयी उमेदवारांनी मुदतीत आपला निवडणूक खर्च सादर केला नाही. त्यामुळे सध्या ग्रामपंचायतमध्ये विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या या सदस्यांना नियमानुसार अपात्र ठरविल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.
यांचेवर टांगती तलवार?
अपात्र ठरू शकणाऱ्या ग्रा.पं. सदस्यांमध्ये लता प्रकाश पळसपगार (फुबगाव), गजानन वासुदेव आमझरे, प्रदीप साहेबराव मानकर, मंदा प्रकाश वाघमारे, अर्चना शिवराज भूस्कडे, सुजित सुधाकर नवलकर, मीरा शिवहरी मानकर (सर्व कु-हा ग्रा.पं.), अनिता रामेश्वर भानगे (सर्फाबाद), आश्विनी अनंत गवळी (कुरणखेड), यशवंत गुलाब गोबाडे (हिरुर पूर्णा), मनीषा सुदर्शन माहोरे, विनोद भीमराव कुडवे(राजुरा), अंकुश अशोक गणोरकर (सोनोरी), प्रदीप सुखराम भोकरे (विश्रोळी) इत्यादी ग्रामपंचायतनिहाय सदस्यांचा समावेश आहे.