लहानसहान गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे
चांदूर बाजार : अलीकडे शहरी व ग्रामीण भागात लहान बालकांचा पाण्याच्या टाक्यात बुडून दुर्दैवी मृत्यू होण्याच्या घटना खूप वाढल्या आहेत. बालकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे इतर लहान-सहान अपघातही होत असतात. यात कित्येक निरागस बालकांना जीव गमवावा लागतो, तर अनेक बालके जखमी होतात. तेव्हा असे अपघात टाळण्यासाठी बालकांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे अती गरजेचे झाले आहे.
प्रत्येक पालक मुलांच्या आरोग्याची खूप काळजी घेत असतो. त्याला थोडेफार दुखणे, खुपणे झाल्यास डॉक्टरांकडे नेणे, त्याला काय हवे, नको याची काळजी घेणे या गोष्टी केल्या जातात. आई-वडिलांच्या जीव की प्राण तो बालक असतात. परंतु, बरेचदा लहान-सहान गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि घटना घडल्यानंतर नशीबावर दोष देत असतो. पूर्वी संयुक्त कुटुंब पध्दतीमुळे बालकांना सांभाळण्याची जबाबदारी आजी-आजोबांची असायची. तेही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असत. बालक घराबाहेर खेळत असेल तर त्यांची दृष्टी सदैव त्यांच्यावर असायची. परंतु, अलीकडे विभक्त कुटुंब पध्दतीमुळे मुलांची जबाबदारी केवळ आयावर किंवा शेजाऱ्यांवर टाकून नोकरीला जाणे सुरू आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्य, शिक्षण याबाबतीत पालक जागृत असतात त्याप्रमाणे त्यांच्या दैनंदिन गोष्टीकरिता जागृत असणे आवश्यक आहे.
खेळ हा मुलांच्या आवडीचा विषय आहे. त्यामुळे लहान मुले ज्यावेळी खेळतात त्यावेळी त्याचेकडे बारीक लक्ष ठेवणे, तो जेथे खेळतो तेथे कचरा, घाण, खड्डे, इजा पोहचविणाऱ्या वस्तू आहेत का याची काळजी घेणे, बरेचदा मुले खेळताना त्यांच्या आया कुठेतरी शेजारच्या महिलेसोबत गप्पा रंगवतात. त्यामुळे बालकांकडे दुर्लक्ष होते.
घरी वापरात येणाऱ्या विद्युत उपकरणे, इस्त्री, मिक्सर, टीव्ही, फ्रीज यापासून बालकांना दूर ठेवणे, घरात असलेल्या औषधांचा वापर केल्यानंतर त्या उंच जागी ठेवणे, त्यांच्या स्ट्रीप बाहेर कचरा पेटीत टाकणे, याकरिता सदैव दक्ष असावे तसेच बऱ्याच पालकांना लहान मुलांना प्रवासाला नेताना समोर ट्रॅकवर बसविणे, गाडी स्टँडवर उभी करून मुलांना गाडीवर बसवून ठेवणे, वाहन वेगाने चालविणे, बसमधून प्रवास करताना खिडकीजवळ उभे करणे या अतिशय वाईट सवयी असतात. त्यामुळे बालकाच्या जिविताला धोका होऊ शकतो.
ग्रामीण भागात अनेक पालक चुकीच्या गोष्टी करीत असतात. उन्हात शेतात नेणे, पाळीव जनावरांचे वैरण घालताना मुलांना सोबत ठेवणे, महिलासुध्दा चुलीवर किंवा गॅसवर स्वयंपाक करताना जवळ खेळवणे हे प्रकार जीवघेणे ठरू शकतात. बरेचदा काही महिला स्वयंपाकघरातून तयार केलेल्या पदार्थांचा गंज चिमट्याने अलगत उचलून जेवणाच्या ठिकाणी आणतात. अशावेळी आजूबाजूला मुलं असताना त्यांच्या अंगावर गरम पदार्थ पडून अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशावेळी पालकांची लहानशी चूक जीवावर बेतू शकते. तेव्हा असे लहानमोठे अपघात टाळण्यासाठी स्वतःमध्ये काही सुधारणा करून आपल्या बालकांकडेही काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे झाले आहे.