अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज १२ मार्च १९६५ रोजीे गुरुकुंज आश्रमातून, गुरुदेवनगरपासून एक किमी अंतरावरील उंच टेकडीवर रहायला गेले. तेथे सर्वप्रथम राष्ट्रसंतांनी राहण्यासाठी एक कुटी बांधली व तेथेच राष्ट्रसंतांना रामकृष्ण हरी मंदिराची संकल्पना सूचली. आज जे विशाल रामकृष्ण हरी मंदिर उभे आहे त्या टेकडीला राष्ट्रसंत दास टेकडी म्हणत. कारण ते स्वत:लाच ईश्वराचे दास समजत व त्यांनी लोकांनासुद्धा दास बनून काम करा, लिनतेची भावना अंगी ठेवा, असे ते आपल्या भजनातूनसुद्धा सांगत. ते म्हणत की, ‘तुकड्यादास दास रह जाये अंत मे भी निभे यह फकिरी’ या सर्वांच्या मागे राष्ट्रसंतांचा विशाल दृष्टिकोन होता. पंढरपूरची वारी करण्यादूर - दूर का जाताइथेच येवुनी सदा बसावे वाटतसे भगवंताआषाढी एकादशीला गुरुकुंजात मोठा उत्सव पार पडतो. टेकडीचे नंतर राष्ट्रसंतांनी दास टेकडी असे नामकरण केले. आज याला रामकृष्ण हरी मंदिर, दास टेकडी व विश्व मानव मंदिर या नावानेसुद्धा ओळखला जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीला तेथे भव्य प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. रामकृष्ण हरी मंदिराच्या विषयी राष्ट्रसंत म्हणतात, की रामकृष्ण हरी मंदिराची कल्पना सांप्रदायिक नाही. तात्त्विकच आहे. अखिल विश्वातील उच्चतम मानवाची कल्पना रामकृष्णहरीत अंतर्भूत आहे. कोणत्याही देशा-धर्माचे मानव येथे आल्यास त्यांना मानवधर्माचे हे स्थान आहे असे वाटायला पाहिजे, असे राष्ट्रसंत लिहितात. रामकृष्णहरी मंदिर हे उंच टेकडीवर असून निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे दररोज भाविक येथे मोठ्या संख्येने येतात. मंदिरावर जाण्यासाठी भुयारी मार्गातून जावे लागते. राष्ट्रसंतांनी येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, गुरुनानक, रवींद्रनाथ टागोर, चक्रधर स्वामी, विवेकानंद, महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी, स्वामी दयानंद भगवान गौतम बुद्ध, डॉ. अल्बर्ट श्वार्टटार, डॉ. मार्टिंन लुथर किंग, डॉ. अॅनी बेझंट, डी व्हॅलेरा, एम. डगलस, कार्ल मार्क्स व महमंद पैगंबर यांचे प्रतिकात्मक अशा २७ मूर्ती बसविण्यात याव्यात, असे सांगितले होते. त्याप्रमाणे येथे काही मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. राष्ट्रसंतांना सर्व संप्रदायांना एकत्र आणावयाचे आहे व सर्वांनी एकत्र येऊन विश्वाचे कल्याण करावे हा राष्ट्रसंतांचा विशाल दृष्टिकोन होता. येथे जागतिक ग्रंथालय असावे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न होते. ते साकारण्यासाठी संचालक मंडळीचे प्रयत्न सुरू आहे. जगभऱ्यातून येथे लोकांनी येऊन अभ्यास करावा व अखिल मानव जातीचे कल्याण व्हावे, हा त्यामागचा उद्देश होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील अखेरचे दिवस येथेच घालवले. ते ज्या झोपडीत राहत त्या कुटीची जपवणूक करण्यात आली आहे. राष्ट्रसंत ज्या बंगईवर बसत तीही शाबूत आहे. रामकृष्ण हरी मंदिरात दररोज ब्रम्हमुहूर्तावर ध्यान व सायंकाळी प्रार्थनेचा कार्यक्रम नियमिंत होतो. महाराजांच्या पुण्यतिथीच्या व ग्रामजयंतीच्या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे मंदिर अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाअंतर्गत असून स्वतंत्र समिती येथील कार्यभार पाहते. यामध्ये महादेव नाकाडे समिती प्रमुख म्हणून तर जनसेवक जयस्वाल श्रीराम चांदूरकर, सुरेश चौधरी, अरविंद गहुकर यांच्यासह एकूण २० सदस्य काम पाहतात. भाविकांच्या देणगीतून सर्व खर्च भागविला जातो. येथे गुरुदेव पद्धतीने विवाहाचे आयोजन व अनेक समाजोपयोगी कार्यक्रम होतात. आषाढी एकादशीच्या दिवशी येथे पंढरीचे स्वरुप पहायला मिळते. दास टेकडीवरुन गुरुकुंज आश्रमाचे आल्हाददायक व निसर्गरम्य दृश्यसुद्धा दिसते. राष्ट्रसंतांनी निर्माण केलेले रामकृष्ण हरी मंदिर हे खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. या विश्वमंदिरात २२ ते २९ जानेवारीदरम्यान माघशुद्ध दशमी महोत्सव साजरा होत आहे. (प्रतिनिधी)
सर्वधर्म समभावाचे प्रतीक, विश्वमानव मंदिर
By admin | Published: January 22, 2015 12:18 AM