फोटो पी २८ हरिसाल होळी
दीपाली चव्हाण अमर रहे : चपलांचा प्रसाद
धारणी/ चिखलदरा : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात वन कर्मचाऱ्यांनी हरिसाल येथे रविवारी सायंकाळी ६ वाजता मेळघाटचे तत्कालीन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी आणि निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला यांचे पोस्टर लावून होळीचे दहन केले.
यावेळी दीपाली चव्हाण अमर रहे, एम. एस. रेड्डी मुर्दाबाद, विनोद शिवकुमार मुर्दाबाद असे नारे लावत दोघांच्या फोटोंना महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी चपलेचा प्रसाद दिला. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. सर्वत्र या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला फाशी देण्यासह त्याला बळ देणाऱ्या एम एस. रेड्डींना निलंबित व बडतर्फ करण्याची मागणी वनपाल वनकर्मचारी संघटनेच्यावतीने लावून धरण्यात आली आहे. रविवारी खासदार नवनीत राणा व बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याकडे वनपाल व वन कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडल्या. मोठ्या प्रमाणात वनविभागातील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बॉक्स
अनेक दीपाली आहेत वनविभागात
रविवारी हरिसाल येथे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक होळीचे दहन करताना उपस्थित काही महिला कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडत अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली. गावकरी व अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. विनोद शिवकुमार बालाचे अनेक कारनामे यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले.
क्रूर प्रवृत्तीचे दहन
आरोपी विनोद शिवकुमार बाला व अन्य अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून अजूनही कुणी महिला कर्मचारी व इतर कर्मचारी बळी पडू नये, त्या राबवून घेण्याच्या क्रूर प्रवृत्तीचे दहन करण्याचा निर्णय वनपाल वनरक्षक संघटनेने घेतला. या क्रूर प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांचे पोस्टर होळीला गुंडाळून जाळण्यात आले. वनपाल, वनकर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनेचे विविध पदाधिकारी कर्मचारी, गावकरी उपस्थित होते.