अमरावती : राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असतानासुद्धा ताडोबा-अंधारीत वाघ बघण्यासाठी पर्यटक वेटिंगवर असतात. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मेळघाट, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटक पाठ फिरवत आहेत. येथे वाघांची संख्या कमी असल्याचा अनुभव पर्यटकांना येत असून, दऱ्याखोऱ्यांमुळेसुद्धा मेळघाटाकडे पर्यटकांनी पाठ फिरविल्याचे वास्तव आहे.
उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने पर्यटकांची पावले जंगलांच्या दिशेने वळली आहेत. महाराष्ट्रात मेळघाट, ताडोबा, नवेगाव - नागझिरा, बोर, सह्याद्री, पेंच असे एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प २५०० चौरस मीटर आणि सर्वांत मोठ्या मेळघाटात केवळ ५५ वाघांचे अस्तित्व दिसून येते. मात्र, विदर्भातील पेंच, मेळघाट, बोर, नवेगाव बांध या राष्ट्रीय उद्यानाला मागे सोडत ताडोबा-अंधारीने उच्चांक गाठला आहे. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही लाखांवर पोहोचलेली असून, याखालोखाल टिपेश्वर अभयारण्यात केवळ १० वाघ असताना दुसऱ्या क्रमांकाची पसंती टिपेश्वरला मिळत आहे. येथे १ जानेवारी ते २५ मार्च २०२३ पर्यंत ४० हजार, तर ताडोबात एक लाख पर्यटकांना वाघ दिसल्याने या दोन जंगलांची चर्चा कमालीची वाढलेली आहे.
मेळघाट का मागे पडले?
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार मोठा आहे. या प्रकल्पाला मुख्य वनसंरक्षक दर्जाचा अधिकारी व ३५ वनपरिक्षेत्र असताना हवे तसे पर्यटन या ठिकाणी होताना दिसून येत नाही. गेल्या १७ वर्षांपासून मेळघाटात केवळ ५५ ते ६० वाघांचे अस्तित्व टिकून आहे. कारण डोंगर, दऱ्याखोऱ्यांचे हे जंगल वाघांच्या प्रजननासाठी अनुकूल नसल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगतात. वाघ दिसत नसल्याने मेळघाटात वर्षभरात केवळ २० ते २५ हजार पर्यटकांनी भेट दिलेली आहे, हे विशेष.
टिपेश्वर अभयारण्यात हमखास दिसतो वाघ
ताडोबानंतर सर्वाधिक पर्यटक खेचणारे टिपेश्वर अभयारण्य अत्यंत लहान आहे. मात्र, या ठिकाणी ताडोबातून ये-जा करणारे वाघ पर्यटकांना खुणावत आहेत. केवळ १० वाघांच्या भरवशावर या अभयारण्याने मेळघाटला मागे साेडले आहे. या ठिकाणी लाखो पर्यटक भेट देत आहेत. केवळ दोन प्रवेशद्वारांवरून पर्यटकांना आत शिरण्याची मुभा असून, वाघ या ठिकाणी हमखास दिसत असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर महाराष्ट्राच्या नकाशावर झळकत आहे.