लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकान, मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना राज्य सरकारने फळउत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचा दुजाेरा दिला. यातून शेतकऱ्यांचे अर्थकारण बळावेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला. मात्र, वाईन ही दारूच आहे, असे म्हणत भाजपने महाविकास आघाडीवर प्रहार केला. भाजपच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या. आंदोलने करून शासनविरोधी वातावरण तयार केले, हे विशेष.राज्य सरकारने वाईन ही दारू नाही; तर विरोधकांनी महाराष्ट्राची मद्यराष्ट्र करण्याच्या दिशेनेे वाटचाल सुरू झाल्याचा आरोप केला आहे. भाजपने वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्यासाठी राज्यभर आंदोलने केलीत. राजकमल चौकातही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आंदोलन केले. एवढेच नव्हे तर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीसुद्धा यात उडी घेतली आहे. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तूर्त याविषयी महाविकास आघाडी सरकारने ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. हा निर्णय शेतकरीहिताचा असेल तर तो योग्य आहे, अशा बोलक्या प्रतिक्रिया काँग्रेस, सेना, राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांच्या आहेत. रोजगाराची ग्वाही देत त्यांनी या निर्णयाची बूज राखली. मात्र, राज्य सरकारने भारतीय संस्कृतीवर घाला घातल्याचा आरोप भाजपच्या महिला नेत्यांनी लगावला.
काय आहे राज्य सरकारचा निर्णय- महाविकास आघाडी सरकारने नुकताच काही दिवसांपूर्वी किराणा दुकान अथवा मॉलमध्ये वाइन विक्री करण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे.
महिला सामाजिक कार्यकर्त्या काय म्हणतात?
शासनाच्या निर्णयाने अल्कोहोल कल्चरला बळ मिळेल. एक्स्पोर्टला चालना देऊनही शेतकऱ्यांचे हित साधले जाऊ शकले असते. मुले आकर्षणातून त्याकडे वळतील. - हिना नावेद, अमरावती
महिला नेत्यांना काय वाटते?
शासनाची वाईट दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा, ही समस्त महिला वर्गाची मागणी आहे. आईला पुढील पिढीची चिंता सतावत आहे.- निवेदिता चौधरी, जिल्हाध्यक्ष, भाजप
महाविकास आघाडी सरकारचा निर्णय फळउत्पादक शेतकरी हिताचा आहे. स्थानिकांना रोजगाराचे साधन निर्माण होणार आहे. वाईनकडे दारू म्हणून बघता येणार नाही. - संगीता ठाकरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस
परवानगी मिळत असेल तरी ज्यांना घ्यायची ते कुठूनही घेतातच. सिगारेट, गुटखा खुलेआम मिळतात. वाइन ही दारू नाही, हे शासनाने अगोदरच स्पष्ट केले आहे. - ज्योती औगड, जिल्हाध्यक्षशिवसेना महिला आघाडी
वाईन ही दारू नाही, हे शासनाने स्पष्ट केले आहे. डॉक्टर, तज्ज्ञाच्या सल्ल्यानंतरच हा निर्णय झाला असावा. गुलाबापासूनदेखील वाईन निर्मिती केली जाते. - डॉ. अंजली ठाकरे, शहराध्यक्ष महिला काँग्रेस
वाईन विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ नक्कीच बिघडेल. किराणा दुकानात लहान मुले जातात, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. आदर्शावरही त्याचा विपरीत परिणाम होईल. - पंकजा इंगळे, अमरावती