विद्यापीठ प्रशासनाला निवेदन, कागदपत्र गहाळ प्रकरण
अमरावती : एमबीएच्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र गहाळ झाल्याप्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, प्रशासनाने दोषींना पाठीशी घातल्यास आम्ही ठोकशाही मार्ग अवलंबू, असा इशारा स्थानिक शिवसेनेने दिला आहे.
प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांना दिलेल्या निवेदनातून उपशहरप्रमुख आशिष ठाकरे यांनी संत गाडगे बाबा विद्यापीठामधील व्यवसाय प्रबंधन व प्रशासन विभागातून (एमबीए) भाग १ साठी प्रवेशित विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्रे काही दिवसांपूर्वी गहाळ झाले आहे. त्यामुळे कागदपत्र गहाळ करणाऱ्या दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप विद्यार्थ्यांना ना कागदपत्र बनवून देण्यात आले, ना दोषींवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे आशिष ठाकरे यांच्या नेतृत्वात काही विद्यार्थ्यांनी प्रकुलगुरुंची भेट घेतली. १५ दिवसांच्या आता गहाळ झालेल्या १० विद्यार्थ्यांचे कागदपत्र काढून देत दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सागर ढाकुलकर, ऋषिकेश वासनकर, प्रतीक चिमणकर, निखिल चोपकर, राम उगले, सुशांत साखरे, पूजा डेहनकर, राधिका यावले, प्राजक्ता सोनेकर, वैष्णवी धंदर, राधिका सोळंके, पूनम सातपुते, कांचन कायंदे, हेमा शर्मा, शरद शर्मा यांच्यासह अन्य विद्यार्थी उपस्थित होते.