अमरावती : नायलॉन मांजावर बंदी असूनसुद्धा त्याच्या सर्रास वापराबाबत कसून चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन हेल्पिंग हँड या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने पोलीस आयुक्तांना देण्यात आले.
पुंडलिकबाबा ते पॅराडाईज कॉलनी मार्गावर विद्या शंकर गवई (२३) हिचा नायलॉन मांजाने काही दिवसांपूर्वी गळा चिरून मृत्यू झाला. काही दिवसांत अशा बऱ्याच घटना घडल्याचे वृत्तपत्रात वाचण्यात आले. काहींना अपंगत्व, तर काहींना आपले प्राण गमावावे लागले. नायलॉन मांजावर बंदी असूनसुद्धा तो मिळतो कसा तसेच याचा खेळ होईपर्यंत सर्वांचा निदर्शनास येऊनसुद्धा नायलॉन मांजा वापरण्यावर व विकण्यावर कार्यवाही होत नाही. या कारणामुळे आतापर्यंत झालेल्या अपघाताची कसून चौकशी करण्याची मागणी हेल्पिंग हॅन्डच्यावतीने पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भूषण दलाल, राहुल ठाकूर, अभिजित पाठक, संदीप करपेकर, प्रतिभा देशमुख, नजमा काजी, संगीता आठवले आदी उपस्थित होते.