तहसील कार्यालयाच्या सभागृहात मध्य रेल्वे व मोर्शी महसूल विभागाची बैठक प्रभारी तहसीलदार विठ्ठल वंजारी याच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली. या बैठकीला नागपूर मध्य रेल्वे विभागाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार भोसले तसेच मध्य रेल्वेचे वरिष्ठ अभियंता अमरनाथ दुबे, रेल्वे पोलीस उपनिरीक्षक रमेश वाघमारे, हेड कॉन्स्टेबल जगदीश नेहते व राकेश सिंह, प्रवीण निकम प्रामुख्याने उपस्थित होते.
नरखेड-अमरावती हा रेल्वे मार्ग मोर्शी तालुक्यातून जात असल्याने हिवरखेड, दापोरी, मनीमपूर, मायवाडी, पाळा, मोर्शी, खानापूर, उदखेड, येरला, कोळविहीर, रिद्धपूर मार्गे चांदूर बाजारला जातो. या रेल्वे मार्गाच्या बाजूला अनेक शेतकऱ्यांची शेती असल्याने त्यांना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते. शेती करण्यासाठी बैल जोडी व इतर पाळीव प्राणी रेल्वे रूळ ओलांडून जात असताना, अपघात होऊन मृत्युमुखी पडू शकतात. प्रवासी रेल्वे गाड्या ठरावीक वेळेनुसार चालत असते. परंतु, मालगाड्या या प्रामुख्याने अवेळी धावत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात जीवितहानीसुद्धा होऊ शकते. याच उद्देशाने महसूल विभागाच्या सर्व मंडळ अधिकाऱ्यांना मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. मध्य रेल्वे विभागाच्यावतीने शेती करताना शेतकऱ्यांचे जर काही नुकसान झाले, तर त्याबाबतदेखील माहितीपर मार्गदर्शन करण्यात आले.