अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सन २०२१-२०२२ या वर्षाचा अर्थसंकल्प १२ मार्च रोजी अधिसभेत सर्वानुमते मंजूर झाला. मात्र, या अर्थसंकल्पाबाबत तथ्यहीन आरोप करणारे दिनेश सूर्यवंशी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कुलगुरूंकडे गुरुवारी अधिसभा सदस्यांनी केली.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ च्या कलम २८ मधील तरतुदीनुसार विद्यापीठाची अधिसभा ही सर्वोच्च प्राधिकारिणी आहे. या प्राधिकारिणीला विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार प्राप्त आहे. असे असताना काही दिवसांपासून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व अधिसभेचे माजी सदस्य दिनेश सूर्यवंशी हे वृत्तपत्र व समाज माध्यमांद्वारा अर्थसंकल्प व त्यानुषंगाने कुलगुरूंच्या आणि अधिसभेच्या सदस्यांबाबत आक्षेपार्ह अफवा पसरवित आहेत. हा अर्थसंकल्प अधिसभेत एकमताने मंजूर केल्याने अप्रत्यक्षपणे जणू काही अधिसभेचे सर्व सदस्य हे नालायक आहेत, असा आव आणून अनेक आरोप करीत ते सुटले आहेत.
दिनेश सूर्यवंशी हे सद्यस्थितीत अमरावती विद्यापीठ संलग्नित नरसम्म्मा हिरय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त आहेत. त्यामुळे ते विद्यापीठ व्यवस्थेचा एक घटक आहेत. त्यामुळे सूर्यवंशी यांची ही कृती विद्यापीठाची सामाजिक प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यांच्या या कृतीमुळे त्यांनी विद्यापीठ अधिनियम, परिनियम, अध्यादेश व शिक्षकांना लागू असलेले कोड ऑफ प्रोफेशनल इथीक्स यामधील तरतुदींचा भंग केलेला आहे. अकारण विद्यापीठाची प्रतिमा कलंकित झालेली असून, यास ते पूर्णपणे जबाबदार ठरतात. या बेकायदेशीर कृती आणि वक्तव्यांमुळे दिनेश सूर्यवंशी शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अमरावती विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयाच्या संलग्नीकरणावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे..
विद्यापीठाची समाजात होत असलेली बदनामी थांबविण्यासाठी विद्यापीठ कायदा, परिनियम, अध्यादेश आदी मधील तरतुदींचा वापर करून विद्यापीठाने दिनेश सूर्यवंशी यांच्यावर तातडीने उचित कारवाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलावी अशी मागणी प्रदीप खेडकर, के.एम. खेडकर, अ. मो. चौहाण, मीनल ठाकरे, ए.बी. देशमुख, अरूणा पाटील, प्राचार्य अनिल राठोड, प्रफुल गवई, निशीकांत देशपांडे, मनीष हावरे, सुनील मानकर आदी अधिसभा सदस्यांनी केली आहे.
--------------------
अधिसभा सदस्यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. कुलगुरू हल्ली सुटीवर असून, ते रूजू होताच याबाबत निर्णय घेण्यात येईल.
- एफ.सी. रघुवंशी, अधिष्ठाता अमरावती विद्यापीठ.