डोक्यावर सिलेंडर घेत मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 06:09 PM2022-04-04T18:09:06+5:302022-04-04T19:03:08+5:30
निवडणूक संपली की भाव वाढ हे काही योग्य नाही, त्यामुळे आता जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला.
अमरावती : पाच राज्यातील निवडणुका संपताच अपेक्षेप्रमाणे देशात महागाईचा विस्फोट झाला आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून निवडणुकीचा हंगाम वगळता सातत्याने महागाई वाढत चालली आहे. खोट बोल आणि रेटून कर अस केंद्र सरकारचं चाललं असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या व अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला.
आज (दि. ४ एप्रिल) अमरावती येथील इर्विन चौकात ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या आंदोलनात डोक्यावर सिलेंडर घेऊन त्या मोदी सरकारच्या महागाई विरोधातील ‘महागाई मुक्त भारत’ आंदोलनात सहभागी झाल्या. तसेच त्यांनी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत घोषणाही दिल्या.
निवडणूक संपत नाही तोच पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच महागले. ही भाव वाढ हे काही योग्य नाही, त्यामुळे आता जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला. तसेच केंद्र सरकारच्या दुजाभावामुळे केंद्र आणि राज्य हा संघर्ष या देशाला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
डोक्यावर सिलेंडर घेत मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला केंद्र सरकारचा निषेध#yashomatithakurpic.twitter.com/dMBuCbP0DT
— Lokmat (@lokmat) April 4, 2022
केंद्र सरकारने एवढी महागाई वाढवणं हे अपेक्षित नाही, हे त्रासदायक आहे. तसेच, जे काही केंद्र सरकार करतं ते सगळ सोन्याहून पिवळं आणि राज्य सरकार एकदम गटारमधली, ही जी पद्धत सुरू झाली ते देशासाठी चांगलं नाही. जे अधिकार केंद्राचे आहेत ते केंद्राचे आहेच पण जे अधिकार राज्याचे आहे ते राज्याचेच आहेत. हा संघर्ष या देशाला कुठे नेऊन ठेवेल अजून तुकडे पाडेल का देशाचे हा प्रश्न उपस्थित होत आहे, असेही त्या म्हणाल्या. संविधानाला कस तोडता येईल याच्याकडे केंद्र सरकारचे संपूर्ण लक्ष केंद्रित असल्याचा आरोप त्यांनी केला. या आंदोलनात हजारो कार्यकर्ते आणि जनता मोठया संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.