पोलिसात तक्रार : ३० वर्षांपूर्वीचे अनेक वृक्ष तोडलेअमरावती : मोर्शी तालुक्यातील तळेगाव दाभेरीतील एका शेतशिवारातून ३० वर्षांपूर्वीं लागवड केलेल्या आठ कडूनिंबाच्या वृक्षाची अवैधरीत्या कटाई करण्यात आली. यासंदर्भात चैतन्य दिगांबर राणे यांनी शिरखेड पोलिसासह मोर्शी तहसीलदारांकडे तक्रार नोंदविली आहे. तळेगाव दाभेरीतील रहिवासी चैतन्य राणे यांच्या मालकीचे सर्वे क्रमांक ३३ मधील ३ हेक्टर १८ आर कोरडवाहू शेती आहे. या शेताच्या पश्चिम धुऱ्याने सुभाष किसन इंगोले यांचे शेत आहे. चैतन्य राणे यांनी यंदा सोयाबीनची पेरणी केली होती, तर सध्या त्यांनी शेत पेरणीयोग्य केले आहे. मात्र, गैरअर्जदार इंगोले यांनी चाकोली व पाला पाचोळा टाकून शेत खराब केले आहे. ३ दिवसांपूर्वी चैतन्य हे शेतात गेले असता त्यांना शेतातील निंबाच्या वृक्षाची कटाई केल्याचे आढळले. ३० वर्षांपासूनचे हे वृक्ष होते, त्यांची गैरअर्जदारांनी कटाई केल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. यासंदर्भात शिरखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मात्र, अद्याप पंचनामा झाला नसून आरोपीविरुध्द कोणतीही कारवाई झालेली नाही. यावरून पोलिसांची अकार्यक्षमता दिसून येते. कारवाई न केल्यास वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
तळेगाव दाभेरीत अवैध वृक्ष कटाईला ऊत
By admin | Published: June 17, 2016 12:24 AM