अमरावती : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानद्वारे संचालित महिला बचतगटांचे तालुकास्तरीय प्रदर्शन व मेळावा नया अकोला येथे पार पडला. तालुकास्तरीय महिला बचतगटांच्या ग्राम संघाचे जाळे विनण्यासाठी उमेदमार्फत झालेले काम हे सर्वधर्म समभाव व एकतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी केले.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य गणेश कडू, सरपंच सुजाता तिडके, सहायक गटविकास अधिकारी दवंडे, उपसरपंच माधुरी सवाई, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रदर्शनात अनेक गावांतील महिलांचे बचतगट सहभागी झाले.
याप्रसंगी घरकुल कार्याचा राज्यस्तरीय पुरस्कार अमरावती पंचायत समितीला मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी गटविकास अधिकारी व त्यांच्या अधिनस्थ सहकाऱ्यांचा तसेच तालुक्यातील महिला बचत गटांना सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल उमेदच्या तालुका अभियान व्यवस्थापक सुचिता पाटील यांचाही सत्कार केला. मान्यवरांच्या हस्ते सक्षम महिला बचतगटांना बँक कर्ज मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन याप्रसंगी गटविकास अधिकारी विजयकुमार रहाटे यांनी केले. आभार प्रदर्शन सरपंच तिडके यांनी केले. अडीच हजार रोपांची लागवड अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
------------------