अमरावती : बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तालुकानिहाय समित्या गठित करण्याचा आदेश शुक्रवारी जारी केला.
जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूसदृश स्थिती आढळून आली नाही. मात्र, दक्षता घेतली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करेल. समितीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, बर्ड फ्लू संसर्गाचा प्रसार होऊ नये, याची दक्षता घेणे व आवश्यकता भासल्यास बाधित क्षेत्रात कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
तहसीलदार समितीचे सदस्य असतील व कामकाज समन्वय, ब्लिचिंग पावडर, प्लास्टिक बॅग आदी साहित्य पुरवठ्याची व आवश्यकता भासल्यास मृत कुक्कुट पक्ष्यांचे तलाठी, ग्रामसेवक व पशुधन विकास अधिकारी यांच्यामार्फत स्थळ पंचनामा करून घेण्याची त्यांची जबाबदारी असेल.
तालुका आरोग्य अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी हे सदस्य सचिव असतील. दैनंदिन अहवाल देणे, रॅपिड रिस्पॉन्स टीमच्या सदस्यांची आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकांकडून करून घेणे, आवश्यकता तेथे पीपीई किट पुरविणे, औषधसाठा देणे, मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी साहित्य पुरविण्याची त्यांची जबाबदारी असेल. पोलीस निरीक्षक हे सदस्य असून, त्यांना प्रतिबंधित क्षेत्रात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी नेमणे आदी जबाबदारी देण्यात आली आहे. पशुधन विस्तार अधिकारी (विस्तार) यांच्याकडे प्रभावी जनजागृती व संबंधित बाजारावर देखरेख ठेवणे ही जबाबदारी आहे.
बॉक्स
यांच्यावरही जबाबदारी
जलसंपदा विभागाचे उपअभियंता व क्षेत्रीय वनाधिकारी या सदस्यांवर स्थलांतरित पक्षी, वन्यपक्षी आदींद्वारे बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागाशी समन्वय ठेवून उपाययोजना करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एसडीओंच्या मार्गदर्शनात या समित्या कामकाज करणार आहेत.