पाणी पेटले, सात गावांचे प्रस्ताव मंजूर, तीन विहिरी अधिग्रहित, हातपंपाच्या घशाला कोरड
चिखलदरा : तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी पाड्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे टँकर लावायला सुरुवात झाली आहे. तीन गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सात गावांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. एकूण २५ गावांत भीषण पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पाण्याची पातळी खालावल्याने हातपंपाच्या घशाला कोरड पडली आहे.
दरवर्षी मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. डोंगरदऱ्यात उंच-सखल भागावर असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये नदी-नाले लवकरच कोरडे पडतात, तर हातपंपसुद्धा कोरडे पडतात. पाण्यासाठी आदिवासींना गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे चित्र आहे. प्रशासनाच्यावतीने दरवर्षी या सर्व गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. फेब्रुवारी महिन्यापासूनच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवते. टँकरमध्ये पाणी भरताना संबंधित आदिवासींना कोरोना नियमानुसार फिजिकल डिस्टन्सिंग नियम तोंडाला मास्क नियमित वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे
बॉक्स
तीन गावांना पुरवठा, सात गावांचे प्रस्ताव मंजूर
तालुक्यातील एकझिरा, लवादा, आकी या तीन गावांत एक महिन्यापासून टँकर सुरू आहे. तोरणवाडी, धरमडोह, बहादरपूर, सोमवारखेडा, मलकापूर, मोथा, मोथाखेडा या सात गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठ्याचा हा प्रस्ताव प्रशासनाने मंजूर केला आहे.
बॉक्स
दरवर्षी किमान २५ गावांत भीषण टंचाई
तालुक्यातील दीडशेवर गावांपैकी किमान २५ गावांमध्ये दरवर्षी भीषण पाण्याची टंचाई जाणवते. त्यात आकी, बगदरी, सोनापूर, सोमवारखेडा, एकझिरा, खंडुखेडा, तारुबंधा, मलकापूर, पाचडोंगरी, धरमडोह, बहाद्दरपूर, कोयलारी, मोथा, काला पांढरी, मनभंग, कोरडा हनुमान ढाणा, खोंगडा आदी गावांचा समावेश आहे. तोरणवाडी, हतरूचा सरपंच ढाणा, पीएचसी ढाणा, बडा ढाणा, कोरडा स्कूल ढाणा येथील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.