जितेंद्र दखनेअमरावती: जिल्ह्यात मे महिन्यामध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मागील आठवड्यात टँकरची संख्या ७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ५५ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, त्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी १५ मेपर्यंत २७ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदा मात्र हा आकडा केवळ ७ वर आहे. तर विहीर अधिग्रहणाची गावे गतवर्षीपेक्षा यंदा वाढली आहेत.
यंदा पाणीटंचाईची फारशी तीव्रता जाणवणार नाही, असा कयास होता; मात्र तो फोल ठरत आहे. चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून, सहा गावांत, तर चांदू रेल्वे तालुक्यातील एका गावात टँकर लागले आहेत. तर ५५ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले, सर्वाधिक टंचाई चिखलदरा तालुक्यात जाणवत असून आतापासूनच ग्रामस्थांना गावाबाहेरून, वाड्यांमधून पाणी आणावे लागत आहे. येणाऱ्या काळात टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अनेक गावांत हातपंप बंद पडले असून, ते दुरुस्तीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पाणीपुरवठा विभागाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. मोजक्या कर्मचाऱ्यांवरच ही कामे करावी लागत आहेत. चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक हातपंप बंद आहेत. यंदा उशिरा का होईना मात्र टंचाई आराखडा तयार केला. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई निवारणार्थ कामे केली जात आहेत.ही आहेत टँकरची गावेचिखलदरा : खोंगडा, मोथा, आकी, घोंगडा, रायपूर, सोमवारखेडा. चांदूर रेल्वे : सावंगी मग्रापूर याशिवाय या तालुक्यामध्ये अधिग्रहित झाल्या विहिरी. अमरावती, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, चिखलदरा, तिवसा, चांदूर रेल्वे, अचलपूर, वरूड, मोर्शी. धारणी, या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई निवारणार्थ विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या ७ गावांना टँकरने, तर ५५ गावांत पाणीपुरवठ्याकरिता विहीर अधिग्रहित केलेल्या आहेत. यामाध्यमातून टंचाईचे निवारण केले जात आहे. याशिवाय काही ठिकाणी टंचाईची कामे केली जात आहेत.संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग. जि.प.