टक्केवारी १४६.५१ : महसूल वसुलीत तालुका तिसऱ्या क्रमांकावरमनोज मानतकर नांदगाव खंडेश्वरशासनाकडून निश्चित करण्यात आलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने नांदगाव महसूल विभागाच्या ३ कोटी ८५ लाख ७३ हजारांचे 'टार्गेट' देण्यात आले होते. हे पूर्ण होणार की नाही, असे वाटत असताना नांदगावचे तहसीलदार बी. व्ही. वाहूरवाघ यांनी धडक वसुली मोहीम राबवून महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चक्क ५ कोटी ५५ लाख ५८ हजार रुपयांचा महसूल गोळा केला. मार्च एंडिंगचे 'टार्गेट' पूर्ण करून जिल्ह्याच्या महसूल वसुलीत नांदगाव तालुका तिसऱ्या क्रमांकावर असून १४६.५१ टक्के एवढी वसुलीची टक्केवारी आहे. तालुक्यात १६१ महसुली गावे असून प्रत्येक गावात विशेष महसूल वसुली मोहीम राबविण्यात आली व यामध्ये जमीन महसूल, करमणूक कर, गौण खनीज उत्पन्नातून मिळणारा कर, याद्वारे कर वसुली करून महसूल विभागाच्यावतीने महसूल वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. गेल्या पाच वर्षांत अनेक नागरिकांनी जागेचा कर भरलेला नव्हता. तसेच मागील पाच वर्षांत १६१ गावांत विविध स्वरुपाची कामे करण्यात आली होती. परंतु त्या विकास कामात गौण खनिजाची रॉयल्टीची रक्कम पूर्णपणे भरण्यात आली नव्हती. तसेच ज्या ठिकाणी लेआऊटची निर्मिती झाली अशा ठिकाणच्या नागरिकांनी महसूल विभागाचा अकृषक कर भरला नव्हता, अशा नागरिकांकडून वसुली मोहिमेंतर्गत अकृषक कर वसुली करण्यात आली व सर्वात जास्त कर गौण खनिज वसुलीतून वसूल करण्यात आला. महसूल विभागाच्यावतीने पहिल्यांदाच एवढा महसूल वसूल करण्यात आल्याने तहसीलदारांच्या पुढाकाराने कर्मचाऱ्यांनी सक्तीची वसुली मोहीम राबविल्याचे दिसून येते.
'टार्गेट' तीन कोटी; वसुली पाच कोटींची
By admin | Published: April 09, 2016 12:10 AM