लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या (डीएलबीसी) बैठकीत यावर्षी वाटप करण्यात येणाऱ्या पीककर्जाचे हेक्टरी दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार यंदा कापसाला ६९ हजार, तर सोयाबीनला ६५ हजार रुपयांचे पीककर्ज मिळेल. याशिवाय हंगामात २१०० कोटींच्या पीककर्ज वाटपाचे टार्गेट निश्चित करण्यात आले आहे. तसा प्रस्ताव एसएलबीसीला देण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 'डीएलबीसी'ची बैठक घेण्यात आली. सभेमध्ये शेतकरी प्रतिनिधी नरेंद्र शिंगणे यांनी उत्पादन खर्च वाढल्याने सर्व पिकांच्या कर्ज वाटप दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ करावी, अशी सूचना केली होती. यावर चर्चेअंती पीककर्ज वाटपाच्या दरात १० टक्क्यांनी वाढ करण्याची सूचना जिल्हाधिकारी सौरभकटियार यांनी केली. त्यानुसार यावर्षी खरीप व रब्बी हंगामांसाठी एकत्रित २१०० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे टार्गेट निश्चित करण्यात आले. राज्यस्तरीय तांत्रिक गटाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय झाला. यामध्ये खरिपासाठी १६५० कोटी, तर रब्बीसाठी ४५० कोटी कर्ज वाटपाचा बँकनिहाय आराखडा निश्चित झाल्याचे अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगितले.
राज्यस्तर समितीला प्रस्तावआर्थिक वर्ष संपल्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे नियमित खातेदारांना यंदाच्या खरिपासाठी पीककर्ज वाटप सुरू करण्यात आले. दरम्यान, जिल्हा समितीने प्रस्तावित केलेला बँकनिहाय पीक कर्ज वाटप लक्ष्यांकाचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य समितीला पाठविण्यात आला आहे.
पीक कर्ज वाटपाचे हेक्टरी दर (रु.)कपाशी (जिरायती) ६६,५०० ते ६९,८००संकरित ज्वारी ३२,९०० ते ३५,१००तूर ४५,७०० ते ४७,९००सोयाबीन ५५,९०० ते ६७,३००गहू ४८,४०० ते ५०,८००हरभरा (जिरायती) ३४०० ते ४८२००
पीककर्ज वाटपाचे बँकांनिकाय लक्षांक'एसएलटीसी'कडे मंजुरीसाठी पाठविलेल्या प्रस्तावानुसार यावर्षी खरिपासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना ८७९ कोटी, ग्रामीण बँकांना २१ कोटी, तर जिल्हा बँकेला ७५० असे एकूण १६५० कोटी पीककर्ज वाटपाचे टार्गेट निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये 'एसएलबीसी'मध्ये चर्चेनुसार काही प्रमाणात कमीअधिक होण्याची शक्यता असल्याचे एलडीएम श्याम शर्मा यांनी सांगितले. आता काहीच दिवसांत खरीप हंगाम सुरू होणार आहे.