लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी लस उपलब्ध होणार असून, लसीकरणाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. लसीकरणासाठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ आदी यंत्रणा उभारण्याचे निर्देश टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी डीप फ्रिजर, आईसलाईन रेफ्रिजेरेटर, शीत साखळी केंद्रे, व्हॅक्सीन कॅरिअर, कोल्ड बॉक्स पॅक आदी साधनसामग्री सज्ज ठेवावी तसेच आरोग्य यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कुशल मनुष्यबळ नेमून पथके तयार करावीत. कोरोना प्रतिबंधक दोन लसींचा डोज आहे. पहिली लस टोचल्यानंतर एक महिन्याने दुसरी लस टोचली जाणार आहे. नागरिकांना वेबसाईट व ॲपवर नाव, पत्ता, आधार कार्ड अपलोड केल्यानंतर लसीकरणाबाबत मेसेज येणार आहे.
या ठिकाणी लसीकरण केंद्रजिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १४ ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये, एक वैद्यकीय महाविद्यालय, १३ नागरी आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण केंद्रे उघडण्यात येतील. जिल्ह्यात ४४८१ व्हॅक्सीन कॅरिअर, १३४ डीप फ्रिजर, १३३ आईसलाईन रेफ्रिजेरेटर, २५५ कोल्ड बॉक्स आदी साधने सज्ज ठेवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
लसीकरणाचे टप्पेपहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर (शासकीय आरोग्य कर्मचारी, डॉक्टर), दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर (गृह, महसूल, होमगार्ड संबंधित अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी), तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील हायरिस्क व्यक्ती व चौथ्या टप्प्यात उर्वरित सर्व नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे.