लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तौक्ते वादळामुळे झालेला हवामान शास्त्रीय बदलात रविवारी दुपारी मान्सूनपूर्व वादळासह पावसाने शहराला चांगलाच तडाखा दिला. अनेक भागांतील वृक्ष उन्मळून पडली. त्याखाली कार दबली, काही भागातील टिनपत्रे उडाली, जाहिरातीचे फलके पडलीत, झाडांच्या फांद्यामुळे विद्युत तारा तुटल्या. अर्ध्याअधिक शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळपर्यत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.
शहरात दुपारी १ पासून सुमारे ४५ मिनिटे वादळासह मान्सूनपूर्व पावसाने शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. कॅम्प परिसरात झाड पडल्याने त्याखाली कार दबली. राधानगरातदेखील झाड पडल्याने कार दबल्याचे घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली. याशिवाय पीडीएमएमसी मार्गावर फांद्या पडल्याने विद्युत तारा तुटल्या. रामपूरी कॅम्प भागात हिच स्थिती दिसून आली. याशिवाय सायन्सकोर शाळेचे टिनपत्रे उडाली, विभागीय क्रीडा संकुलातील झाडांच्या फांद्या तुटल्या अन् शेडचे टिन वाकले आहेत. रामपुरी कॅंम्प येथे रोहित्र पडले आहे.याशिवाय झाडही वीज वाहिनीवर पडले आहे. पलास लाईन गाडगेनगर येथेही वीज वाहिनीवर झाड पडून वीज वाहिनी तुटली आहे. याशिवाय शहरातल्या अनेक भागात झाडांच्या फांद्या तुटल्याने दिसून आले. सायंकाली उशीरापर्यत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.
अचानक आलेल्या वादळासह पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली तर बच्चे कंपनींनी पावसाचा आनंद लुटला. संचारबंदी सुरु असल्याने रस्त्यांवर तुरळक वाहन असल्याने कुठलेच नुकसान झाले नसल्याचे दिसून आले.
पहिल्याच पावसात महावितरणची पोलखोल
दुपारी अचानक झालेल्या वादळामुळे महावितरण यंत्रणा विस्कळीत होऊन काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्याचबरोबर ११ केव्ही राजकमल, ११ केव्ही एल.आय.सी.११ केव्ही श्रीकृष्ण पेठ आणि ११ केव्ही मोरबाग या ३३ केव्ही पॉवर हाऊस याशिवाय २२० केव्ही अमरावती या उच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही वडाली,११ केव्ही बडनेरा,११ केव्ही टाऊन ३ आणि ११ केव्ही लक्षमीनगर या वीज वाहिन्यांचाही वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू झालेला नव्हता.
२२ पर्यंत ढगाळ वातावरण राहणार कायम
अरबी समुद्रातील चक्रीवादळ तसेच विदर्भावर असलेले चक्राकार वारे आणि अन्य हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भात पुढील पाच दिवस कमी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे. १९ मे पर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण २२ तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. तापमानात विशेष बदल नसल्याची माहिती हवामातज्ञ अनिल बंड यांनी दिली.