अमरावती : अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करीत असताना एखाद्यावेळी क्षणार्धात एखादी प्रकाशरेषा चमकून जाताना दिसते. या घटनेस तारा तुटला असे आपण म्हणतो. ती प्रकाशरेषा तारा तुटल्याची नसते. किंबहुना तारा कधी तुटत नसतो. तर ती एक खगोलीय घटना आहे. या घटनेला उल्का वर्षाव म्हणतात. १७ ते १९ नोव्हेंबरच्या पहाटे उल्का वर्षावाची शक्यता जास्त आहे. या खगोलीय घटनेमुळे आकाशात चार दिवस दिवाळी राहणार असल्याचे म्हटले जाते.
या चार दिवसांत सिंह तारकासमूहातून मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. याला ‘लिओनिड्स’ हे प्रसिद्ध नाव आहे. उल्का वर्षावाची तीव्रता, निश्चित, वेळ या गोष्टी खात्रीने सांगता येत नाहीत, निरीक्षणाची तयारी आणि सोशिकता असलेल्यांनीच उल्का पाहण्याचा प्रयत्न करावा. घराबाहेर पडले आणि भराभर उल्का पडताना दिसल्या, अशी अवास्तव कल्पना करून घेऊ नये. उल्काचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणाच्या शास्त्रीय नोंदी यांची खगोल जगतात खूप गरज असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले. सर्व खगोलप्रेमी व जिज्ञासूंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य अवश्य बघावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमराती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.
‘या’ धुमकेतूच्या अवशेषामुळे उल्का वर्षाव
ज्यावेळी एखादी उल्का आपल्याला पडताना दिसते, यासंदर्भात लोकांच्या अंधश्रद्धा आहेत. परंतु, अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कुठेच थारा नाही. सिंह तारकासमूहातून होणारा उल्का वर्षाव हा ‘टेम्पलटटल’या धुमकेतूच्या अवशेषामुळे होतो. हा धूमकेतू ३३ वर्षांनी सूर्याला भेट देतो. उल्का वर्षाव साध्या डोळ्यांनी मध्यरात्रीनंतर घराच्या गच्चीवर किंवा शहराबाहेर जाऊन अंधारातून पाहता येईल.
काय आहे उल्का वर्षाव?
१) धूमकेतू सूर्याला प्रदक्षिण घालत असताना त्यातील काही भाग मोकळा होतो. हे धूमकेतूने मागे टाकलेले अवशेष आहेत. या उल्का एखाद्या तारका समूहातून येत आहेत असे वाटते. तासाला ६० किंवा त्याहून अधिक उल्का आकाशातील एखाद्या भागातून पडत असतील तर त्यास उल्का वर्षाव म्हणतात.
२) काहीवेळा गतिमान उल्का पृथ्वीच्या वातावरणातून खाली येताना त्या घनरूप अवस्थेत पृथ्वीवर येतात. तेव्हा त्यास अशनी म्हणतात. उल्काशास्त्रात अशनीचे स्थान फार मोठे आहे. बाह्य अवकाशातील वस्तूचे नमूने या अशनीमूळे आपणास पाहावयास मिळतात. त्यामुळे वस्तूच्या जडणघडणीचा अर्थ लावता येतो.