अमरावती - राज्यातील ग्रामपंचायत हद्दीतील सौरऊर्जा प्रकल्पांवर कर आकारणी करण्यात येणार आहे. सौरऊर्जा वीजनिर्मिती प्रकल्पांना केवळ जमीन, मोकळा भूखंड, गृहित धरून जमिनीच्या भांडवली मूल्याच्या आधारे कर आकारणी करण्यात यावी, भांडवली मूल्य निश्चितीसाठी बिनशेती जमीन भूखंडाचे रेडिरेकनरचे दर घ्यावे, अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (शुल्क) नियम १९६० मधील तरतुदीनुसार गावाच्या सीमेतील इमारती व जमिनीवर कर बसविण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना आहे. सन २०१५ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेद्वारे इमारती व जमिनीवरील करांबरोबर पवनचक्की व अन्य प्रयोजनासाठी वापरण्यात येणा-या मनो-यांवर कर आकारणीबाबत तरतुदी करण्यात आल्या. मात्र, ग्रामपंचायत हद्दीतील सौरऊर्जा प्रकल्पांवर कशाप्रकारे कर आकारणी करावी, याबाबत स्पष्टता नव्हती. त्या अनुषंगाने ही कर आकारणी कशी करावी, याबाबत ग्रामविकास विभागाने सूचना केल्या आहेत.
असे आहेत निर्देश सौरऊर्जा प्रकल्पातील सौर संयंत्रांव्यतिरिक्त अन्य बांधकामाच्या इमारतींना नियमाप्रमाणे कर आकारणी करावी, संपूर्ण सौरऊर्जा प्रकल्पास औद्योगिक व वाणिज्यिक दर राहणार नाहीत. निवासी व्यवसायिक, औद्योगिक इमारतींच्या छतावरील सौरऊर्जा, वीज निर्मितीच्या संयंत्रांना मालमत्ता कर आकारणी करण्यात येऊ नये, सौरऊर्जा प्रकल्प बंद असल्यावरही कर आकारणी करावी.