अनुदानासाठी 'टार्गेट' : प्रवेशासाठी शिक्षकांची विद्यार्थ्यांवर नजरअमरावती : प्रथमेश हा अमरावती शहरातील आनंनदनगर भागातील रहिवासी. शहरातून खेड्यात शिक्षणासाठी जाण्याचा उफराटा प्रवास करण्याची तशी त्याला गरज नव्हतीच; तथापि पिंपळखुट्याच्या आश्रमांतर्गत असलेल्या शाळेतील शिक्षक किशोर ठाकरे यांनी अवधून सगणे यांना आग्रह केल्यामुळेच त्यांनी प्रथमेशला पिंपळखुट्याच्या निवासी शाळेत धाडले. पिंपळखुटा येथील संत श्री शंकर महाराज समाजकल्याण वसतिगृहात वास्तव्याला असलेली मुले आश्रमाच्याच आवारातील संत श्री शंकर महाराज विद्यामंदिरात शिक्षण घेतात. या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. वसतिगृहात वास्तव्याला असलेल्या मुलांमध्ये अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांतील विद्यार्थी आहेत. दूरदुरून मुले यावीत, असा लौकिक या वसतिगृहाचा वा विद्यालयाचा निश्चितच नाही. विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक गरजू पालकांशी संपर्क साधून त्यांच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रविष्ट करवून घेतात, अशी माहिती 'लोकमत'च्या शोधमोहिमेत उघड झाली आहे. दरवर्षी आवश्यक ते प्रवेश करवून घेण्याचे 'टार्गेट' शिक्षकांना असते. आश्रमातील शाळा, वसतिगृह अनुदानित आहे. अनुदान कायम राखायचे असेल तर नियमानुसारची विद्यार्थी संख्या पूर्ण करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांवर नजरा ठेवून असतात. त्यासाठी प्रलोभन दिले जाते. प्रथमेशच्या शिक्षणाचा कुठलाही खर्च येणार नाही, असे प्रलोभन प्रथमेशच्या कुटुंबीयांनाही देण्यात आले होते. (प्रतिनिधी)ठाकरे गुरुजींचाच फोनप्रथमेश नागपंचमीला घरी येणार म्हणून हर्षभरीत झालेले आई-वडील त्याच्या लाडकौतुकासाठीचा, मेजवाणीसाठीचा अमरावतीत बेत आखत असतानाच तिकडे चिमुकल्या प्रथमेशचा निर्दयीपणे सपासप गळा चिरला गेला- एकदा.. दोनदा... तीनदा ! घटनेनंतर काही वेळाने वडिलांचा फोन बंद असल्यामुळे दुसऱ्याच्या फोनवरून वडिलांना घटनेबाबत निरोप देण्यात आला. मुलाला इर्विनमध्ये नेल्याचा तो निरोप होता. किशोर ठाकरे यांनीच तो निरोप दिला होता. जबाबदारी स्वीकारून धडधाकट, गोरागोमटा मुलगा घेऊन जाणारे ठाकरे गुरुजी मुलगा मरणाच्या दारात असल्याचा निरोप घेऊन आले. आश्रमाकडून खुलासा नाहीप्रथमेश प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्याची अपप्रतिष्ठा झाली. श्री संत शंकर महाराज यांच्या आश्रमातील कारभारावर जाहीरपणे शंका व्यक्त केली जाऊ लागली. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागलेत. ऐकणाऱ्या कुणाच्या काळजाचा ठोका चुकावा इतकी गंभीर घटना आश्रम परिसरात घडूनही आश्रमाच्यावतीने कुठलीही भूमिका जाहीर करण्यात आली नाही. संपर्क साधल्यास प्रतिक्रियेसाठी आश्रमाच्यावतीने कुणीही उपलब्ध होत नाहीत. या अपादर्शितेवर जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आश्रमातील शिक्षकानेच घ्यायला लावला प्रवेश
By admin | Published: August 13, 2016 11:52 PM