लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कंत्राटी शारीरिक शिक्षकाने आपल्या मुलीला शाळेत 'बॅड टच' केल्याची फिर्याद एका महिलेने फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास तो प्रकार घडल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी, फ्रेजरपुरा पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी रियाज नामक पीटी टीचरविरुद्ध विनयभंग व पोस्कोन्वये गुन्हा दाखल केला. तथा तातडीने त्याला अटकदेखील करण्यात आली. फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महापालिकेच्या एका शाळेत तो प्रकार घडला. मो. रियाजऊद्दीन (५०, रा. चपराशीपुरा) असे आरोपी शिक्षकाचे पूर्ण नाव आहे.
फिर्यादी महिलेची १४ वर्षीय मुलगी मनपाच्या एका शाळेची विद्यार्थिनी आहे. २२ ऑगस्ट रोजी फिर्यादी महिला ही कामाला जात असताना पीडिताने तिच्याशी घडलेला अश्लाघ्य प्रकार आईच्या कानावर घातला. त्यानुसार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास ब्रेकदरम्यान त्या शाळेतील एक मुलगी आजारी पडली. त्यामुळे शिक्षकांनी तिला वर्गात नेऊन बसविले. तथा सर्व मुले-मुली तिच्याभोवती गोलाकार जमा झाले. त्यावेळी १४ वर्षीय पीडित मुलगी ही सर्व मुलामुलींच्या मागे उभी होती. त्यावेळी पीटी शिक्षक रियाज हा आपल्या मागे येऊन उभा राहिला. तथा त्याने आपल्याला बॅड टच केल्याची माहिती पीडिताने आईला दिली. आरोपीचा हात झटकून आपण तेथून बाजूला झाले. यापूर्वीदेखील रियाज सरने आपल्याला 'बाहेर फिरून येऊ' असे म्हटले होते, असेही तिने सांगितल्याने पीडिताच्या आईने शाळा गाठली. तथा ती बाब संबंधित मुख्याध्यापकांना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. आरोपीला अटक केली असून, त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार नीलेश करे यांनी 'लोकमत'ला दिली.
महापालिकेकडून कार्यमुक्ततेची कारवाई रियाजउद्दीन हा गेल्या दीड ते दोन वर्षापासून अमरावती महापालिकेत कंत्राटी तत्त्वावर शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत होता. गुरुवारी गुन्हा दाखल होताच व अटकेची माहिती मिळताच त्याला तातडीने कार्यमुक्त करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी उपायुक्त माधुरी मडावी यांनी 'ती' शाळा गाठून वस्तुस्थिती जाणली. मुख्याध्यापक, शिक्षकांना अनुषंगिक निर्देश दिले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम व सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरेदेखील उपस्थित होते.