दर्यापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग शासनाद्वारे सुरू करण्यात आले आहे. नगर परिषद क्षेत्रात अद्याप तशी परवानगी मिळालेली नाही. तथापि, मोबाईलची सुविधा नसलेल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षक घरोघरी जाऊन शिक्षण देत आहेत. मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून नगर परिषदेचे शिक्षक विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी थेट घरी पोहोचत आहेत. सेतु अभ्यासक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी हे शिक्षक करीत आहेत. ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरू आहे. गृहभेटी, शिक्षक मित्र, विद्यार्थी मित्र, स्वाध्यायमाला अशा विविध उपक्रमांद्वारे अध्यापनाची प्रक्रिया कोविड-१९ चे नियम पाळून सुरू आहे. शासननियमानुसार शिक्षक उपस्थिती व अध्यापनाची पडताळणी करण्यासाठी नगर परिषदेची शिक्षण समिती वेळोवेळी शाळांना भेटी देत आहे. शासनाच्या सर्व शैक्षणिक उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे, उपाध्यक्ष सोनू गावंडे, शिक्षण सभापती प्रतिभा चंदू शेवणे, शिक्षण समिती, सर्व नगरसेवक, शिक्षकांना मार्गदर्शन करीत आहेत. प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे हेसुद्धा शाळांना आकस्मिक भेटी देऊन शैक्षणिक उपक्रमाची पाहणी करून शिक्षकांना मार्गदर्शन करीत आहेत.
सेतु अभ्यासक्रमाची योग्य रीतीने अंमलबजावणी करण्यासाठी नुकतीच संयुक्त ऑनलाईन कार्यशाळा पार पडली. यामध्ये मूर्तिजापूर नगर परिषद व दर्यापूरचे शिक्षक सहभागी झाले होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य मिलिंद कुबडे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ज्ञानेश्वर नागरे यांनीही दोन्ही नगर परिषद शिक्षकांना या ऑनलाईन कार्यशाळेत मार्गदर्शन केले. विषय सहायक जितेंद्र काठोळे यांनी सर्व शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाबाबत मार्गदर्शन करून त्यांच्या शंकाचे निराकरण केले.या ऑनलाइन कार्यशाळेमुळे शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून ते विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.