अमरावती : राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची पूर्वतयारी सुरू झाली आहे.
यंदा शिक्षकांच्या बदली धोरणात काही बदल करण्यात आले आहेत. अवघड क्षेत्रातील शाळांचे निकष बदलण्यात आले आहेत. यंदा बदल्या पाच टप्प्यांत होतील. कोरोनाच्या प्रादुर्भावाने भयावह स्वरूप धारण केले असतानाच, बदली प्रक्रियेच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, यासाठी ठरवून दिलेला हरकतींचा कालावधी पाहता, ३१ मे पूर्वी बदल्या होणार की, मुदतवाढ मिळणार याबद्दल शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. यंदा बदल्यांसाठी शिक्षक संघटना आग्रही होत्या. त्यामुळे ग्रामविकास विभागाने गत महिन्यात प्राथमिक शिक्षक बदली निकषात बदल करणारा आदेश जारी केला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बदल्यांची पूर्वतयारी सुरू केली आहे. अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यासाठी सीईओंच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठकही पार पडली.
बॉक्स
अवघड क्षेत्रातील ठरविण्याचे निकष
यापूर्वी अवघड क्षेत्रातील शाळांची निवड अधिकारी प्रत्यक्ष शाळेची जागा पाहणी करीत होते. परंतु, आता त्यासाठी निकष ठरवले गेले आहे. त्यानुसार पेसा, डोंगरी, दोन हजार मि.मी.पर्यंत पडणारे पर्जन्यमान, राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून १० किमी आतमध्ये असणारी शाळा, 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी' न मिळणाऱ्या शाळा, जंगलव्याप्त व हिंस्त्र प्राण्यांचा उपद्रव असणारी गावे आदी निकष देण्यात आले आहेत. यापैकी कोणतेही तीन निकष पूर्ण करणारी शाळा अवघड क्षेत्रातील गणली जाणार आहे. जिल्ह्यत यापूर्वी ३६८ शाळा अवघड क्षेत्रात होत्या. आता नवीन निकषामुळे ही संख्या कमी होणार आहे.