अमरावती : कोरोनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली यंदाही रखडण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या वर्षी बदली होणार नसल्याने दुर्गम भागातील बदलीपात्र शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यंदा बदलीच्या धोरणात काही प्रमाणात बदल झाल्यामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
शासनाने कोरोनाचे कारण देऊन ३० जूनपर्यंत कुठल्याही प्रवर्गाच्या बदल्या करू नये, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा रखडल्या आहेत. जिल्ह्यात अर्थात जिल्हा परिषद अंतर्गत सर्वाधिक असलेल्या आणि गाजणाऱ्या बदल्यांमध्ये प्राथमिक शाळा शिक्षकांचा समावेश असतो. दोन वर्षांपासून या शिक्षकांच्या बदल्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांची दुर्गम अर्थात अवघड भागातील सेवा कालावधी वाढून त्याच्या बदल्यांची प्रक्रिया लांबणार आहे.
ऑनलाईन पोर्टल
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी चार वर्षांपूर्वी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले होते. त्यानुसार थेट राज्य स्तरावरूनच बदली प्रक्रिया राबविली जात होती. त्याला सुरुवातीला शिक्षक संघटनांचा विरोध झाला. परंतु, या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप अगदीच कमी आणि पारदर्शकता अधिक राहत असल्याने शिक्षक संघटनांनी देखील या प्रक्रियेला स्वीकारले. त्यानुसार दोन वर्ष अर्थात २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षात बदल्या झाल्या. सन २०२० मध्ये कोरोनामुळे बदली होऊ शकली नाही. यंदाही तीच स्थिती आहे.