अमरावती : कोरोना नियंत्रण मोहिमेत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगर परिषदेचे शिक्षक ग्रामीण व शहरी भागात काम करीत आहेत. मोहिमेत कार्यरत असताना जिल्ह्यासह राज्यात अनेक शिक्षकांचा मृत्यू झाला. विमा कवच नसल्याने अशा शिक्षकांचे कुटुंब उघड्यावर पडत आहे.
जिल्हा परिषद शाळांचे बरेच शिक्षक कोविड नियंत्रणासाठी ग्रामीण भागात काम करीत आहेत. गृहविलगीकरणात असलेल्या संशयितांची माहिती ते ठेवत आहेत. हे काम करताना शिक्षकांना कोरोनाची लागण होत आहे. मात्र, शासनाकडून विमा कवच दिले गेले नाही. आपल्या पश्चात कुटुंबाचे काय होणार, या प्रश्नाने सेवा देणाऱ्या शिक्षकांचे मनोबल खचत आहे. कोविड नियंत्रण मोहिमेचे कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना ५० लाखांचा विमा कवच शासनाने लागू करावा, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली. मात्र, विम्याचा लाभ अमरावती जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण मोहिमेदरम्यान दगावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबांना मिळालेला नाही. पीडित शिक्षक कुटुंबांना विम्याचे क्लेम देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.
दरम्यान, शिक्षकांची सेवा घेण्यापूर्वी प्रत्येक कोविड दवाखान्यात त्यांच्यासाठी बेड राखीव ठेवावे. कोरोना नियंत्रण मोहिमेत कर्तव्यावर असलेला शिक्षक पॉझिटिव्ह आल्यास त्यांची पुन्हा ड्युटी लावण्यात येऊ नये, अशीही मागणी शिक्षक व संघटनांकडून केली जात आहे. यासंदर्भात शासन व प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे झाले आहे.
बॉक्स
कोरोना साथरोग नियंत्रण मोहीम
कोरोना साथरोग नियंत्रण मोहिमेत जिल्ह्यातील शिक्षक : ३२५
शिक्षकांचा मृत्यू : ०७
कुटुंबाला विमा मिळाला : शून्य
कोट :
कोरोना नियंत्रण मोहिमेत सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या कोविड विमा कवचला शासनाने अजूनही मुदतवाढ दिलेली नाही. सर्वेक्षण करतेवेळी मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्ह्ज, फेस शिल्ड, पीपीई किट आदी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शासन व प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून शिक्षकांना न्याय प्रदान करावा, अशी आमची मागणी आहे.
- शरद तिरमारे, मुख्याध्यापक
कोट
राज्यातील अनेक शिक्षकांचा कोरोना नियंत्रण मोहिमेत मृत्यू झाला. मात्र, बऱ्याच शिक्षकांनी कोविड क्लेम न मिळाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. शिक्षक वगळता इतर सर्व कर्मचाऱ्यांना कोविड विम्याचा लाभ मिळाला आहे. शिक्षकांबाबतच उदासीनता का, असा प्रश्न निर्माण होत आहे. शासन व प्रशासनाने विम्याचे संपूर्ण संरक्षण द्यावे.
- सुरेश मोलके, शिक्षक
कोट
वैद्यकीय प्रमाणपत्र मागविले
ग्रामीण भागातील शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची कोरोना साथरोग नियंत्रण मोहिमेत ड्युटी लावण्यात आली आहे. नगर परिषद, बीडीओ स्तरावरून ही ड्युटी लावली जात आहे. जिल्हा परिषदेचे व अमरावती महापालिकेचे मिळून जवळपास ३२५ वर शिक्षक सेवा बजावत आहेत. आतापर्यंत सात शिक्षकांचा कोरोनो आजाराने मृत्यू झाला. हे कारण अधिकृत ठरण्यासाठी त्यासंबंधीचे वैद्यकीय प्रमाणपत्र मागविण्यात आले आहे. प्रमाणपत्र मिळाल्यावरच पुढील कार्यवाही होईल.
- ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद