अमरावती : ‘फळ्यावर गणित लिहिले, खडू खाली ठेवला, खिशातील तंबाखू काढून मस्तपैकी चोळून एक बार भरला, अन् लिहा रे पोरंहो, असा भरल्या तोंडाने आदेश दिला’ असे करणाऱ्या शिक्षकांना आता अडचणीचे जाणार आहे. तंबाखू किंवा इतर कोणतेही व्यसन करुन शिकविणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केले आहेत. प्रत्यक्ष वर्गात अध्यापन करताना व्यसन करुन शिकविणारे शिक्षक अनेक शाळांमध्ये असतात. सगळेच शिक्षक काही व्यसनाच्या अधिन नसतात. परंतु तरीही तंबाखू किंवा खर्रा खाणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. तंबाखुचे पदार्थ खाऊन विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकाचा अनुभव अनेकांनी घेतला असतो. अशा सर्व शिक्षकांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक परिसर तंबाखू किंवा व्यसनाच्या पदार्थापासून मुक्त करण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. शाळांचा परिसर तंबाखुमुक्त असल्याचे फलक शाळांमध्ये लावण्याबाबत याआधीच आदेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी तंबाखुमुक्तीचा संकल्प सुध्दा करण्यात आला आहे. याच्यापुढे जाऊन आता अधिक कडक कारवाई करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळेतील शिक्षकांना तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट किंवा दारू यासारख्या पदार्थांचे व्यसन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ठाणे येथील ओरिएंटल वुमन प्रोटेक्शन फोरमने याबाबत शासनाला निवेदन दिले होते. त्याआधारे शिक्षण विभागाने नवे आदेश जारी केले आहेत. काही शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताना विविध प्रकारची व्यसने करतात. त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. शिक्षकांकडे बघून विद्यार्थी देखील व्यसनाधिन होत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा व्यसनी शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण सहसंचालक सुनील चव्हाण यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे शिक्षकांना सवयीला लगाम घालावा लागेल. शिक्षण विभागाचे आदेश;-तर नोकरीला मुकावे लागणार असे असेल कारवाईचे स्वरूप४व्यसन करुन शिकविणाऱ्या शिक्षकांना प्रमोशन न देणे, त्यांना शिक्षक पुरस्कारापासून वंचित ठेवणे, व्यसनी शिक्षकांना शासनाच्या सोयी सुविधांपासून वंचित ठेवणे, सूचनांचे पालन न करणाऱ्या शिक्षकांना बडतर्फ करणे. याबाबत वरिष्ठपातळीवर निर्णय झाला असला तरी अद्याप लेखी पत्र प्राप्त झालेले नाही. मात्र, तरीही मंत्रीमहोदयांनी घेतल्या निर्णयानुसार याची अंमलबजावणी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा अत्यंत चांगला निर्णय आहे- एस.बी.कुलकर्णी, शिक्षण उपसंचालक.
शिक्षकांनो ! व्यसन कराल तर घरी जाल
By admin | Published: January 11, 2016 12:00 AM