नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : मेळघाटात दररोज ऐकावे ते नवल असते. आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चक्क जिल्हा परिषदेच्या १६ शाळांना टाळे लागले आहे, तर गुरुजी प्रशिक्षणाला गेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. अतिदुर्गम असलेल्या हतरू केंद्रातील या शाळा बंद होत्या.
कोरोनाच्या काळात शाळा दोन वर्षे बंद राहिल्याने, आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळाले नाही. आता निवडणूक कामासाठी बंद राहत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या दरम्यान १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विविध विभागांतील कर्मचाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात शिक्षकांना निवडणूक कामासाठी घेण्यात आले आहे. त्यांचे आवश्यक प्रशिक्षण चिखलदरा येथे मंगळवारी घेण्यात आले. त्यामुळे अतिदुर्गम हतरू केंद्रातील १६ शाळांवर कुलूप लागले होते.
मंगळवारी १६ शाळा बंद
हतरू केंद्रात १७ शाळा आहेत. पैकी हतरू ढाणा, सरोवरखेडा, मारिता, चिलाटी, कुही, रुईपठार, डोमी, भुत्रूम, सामोरी, सिमोरी ढाणा, एकताई, खुटीदा, भांडुम, सलिता, सुमिता येथील १६ शाळांना मंगळवारी टाळे लागल्याचे चित्र होते. सर्व शिक्षक चिखलदरा येथे निवडणूक प्रशिक्षणाला गेल्याची माहिती केंद्रप्रमुख मोहन जाधव दिली व तशी माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगितले.
भुत्रुम, रुईपठारची शाळा दोन दिवस बंद
भुत्रुम जिल्हा परिषद शाळेत सहावीपर्यंत वर्ग आहे. ५० विद्यार्थी व विनोद लेव्हरकर नामक एक शिक्षक आहेत. रुईपठार येथे चौथीपर्यंत शाळा व २३ विद्यार्थी आहेत. येथे उज्ज्वल भटकर व अशोक मस्के असे दोन शिक्षक आहेत. शनिवारी शाळा करून ते सोमवारी आलेच नाहीत. मंगळवारी निवडणूक प्रशिक्षणाला गेल्याने दोन दिवस शाळा बंद होत्या.
एक शिक्षक, एकच बसफेरी
भुत्रुम येथील जिल्हा परिषद शाळेवर मागील चार वर्षांपासून विनोद लेव्हकर हे एकमेव शिक्षक कार्यरत आहेत. शनिवारी त्यांनी शाळा केली. त्या गावात ये-जा करण्यासाठी एकच बसफेरी आहे. मंगळवारी प्रशिक्षण असल्याने ते येणार तरी कसे, असा सवालच केंद्रप्रमुख मोहन जाधव यांनी केला आहे.
कोणत्या नियमाने शाळांना कुलूप?
निवडणूक ही सुट्टीच्या दिवशी निवडणूक आयोगातर्फे घेतली जाते. परंतु, त्यासाठी शाळा बंद ठेवायचा नियम नाही. मेळघाटात तब्बल १६ शाळांना कुलूप टांगून त्या कुठल्या नियमाने बंद ठेवण्यात आल्या, यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी अरुण शोगोकार हेसुद्धा माहिती देऊ शकले नाहीत.
हातरू परिसरातील दोन शिक्षकी शांळामधील सर्व शिक्षकी शाळांमधील सर्व शिक्षकांना निवडणूक कामात नियुक्त केले. शाळा बंद राहण्यासंदर्भात आपण तहसील कार्यालयाला पत्र दिले आहे. शाळा किती दिवस होत्या, यासंदर्भात माहिती घेत आहे.
- अरुण शोगोकार, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा
सर्व शाळांना नियमित भेटी देतो. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या १७ पैकी १६ शाळांमधील शिक्षक चिखलदरा येथे निवडणूक प्रशिक्षणासाठी गेल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तशी माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे.
- मोहन जाधव, केंद्रप्रमुख, हतरु