अमरावती : विनाअनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षकांनी मंगळवारी नांदगाव पेठजवळ रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरले. रास्ता रोकोमुळे तासभर नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे नांदगाव पेठ पोलिसांनी शेकडो शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे विभागीय अध्यक्ष एस. के. वाहुरवाघ, संगीता शिंदे, पुंडलिक रहाटे, सुरेश सिरसाट, दीपक देशमुख, बाळकृष्ण गावंडे आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे सोमवारी शिक्षकांनी शासनाची प्रतिकात्मक तेरवी साजरी केली. शिक्षण उपसंचालक सुरेश कुळकर्णी यांच्या दालनात उपोषणकर्त्या शिक्षकांनी जाऊन त्यांना जेवणाचे ताट देत नारेबाजी दिली. मंगळवारी हे आंदोलन आणखी तिव्र झाले, शिक्षकांनी नांदगाव पेठजवळील रहाटगाव टी-पॉईन्टवर रास्ता रोको आंदोलन केले. या रास्ता रोकोमध्ये गाडगेनगर पोलिसांनी ९२ आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले़ होते तर नांदगाव पेठ पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.(प्रतिनिधी)
शिक्षकांचा 'रास्ता रोको'
By admin | Published: June 15, 2016 12:14 AM