अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे धोरण नुकतेच ग्रामविकास विभागाने जाहीर केले. त्यानुसार प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी शिक्षण विभागातील १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेसाठी लागणारी माहिती व यासंदर्भात करावयाच्या प्रक्रियेकरिता सेवा तात्पुर्त्या अधिग्रहित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या पथकप्रमुख म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांची नियुक्त केली आहे. याशिवाय शालेय पोषण आहार अधीक्षक अश्र्विनी पवार, प्रभारी उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने, नितीन उंडे, विस्तार अधिकारी संगीता सोनोने, एमआयएस कोऑर्डिनेटर प्रीती गावंडे, डाटा ऑपरेटर शाम देशमुख, अतुल देशमुख आणि कनिष्ठ सहायक विनोद विखारसह १३ जणांची बदली प्रक्रियेसाठी नियुक्ती केली आहे. ही सर्व प्रक्रिया सीईओ अविश्यांत पंडा, प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान आदींच्या मार्गदर्शनानुसार पार पडणार आहे.