मोर्शी : यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड केली. परंतु बाजारात हिरव्या मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादनखर्चही निघेना, अशी स्थिती झालेली आहे.
जिल्ह्यातील हिरव्या मिरचीची बाजारपेठ म्हणून राजुराबाजार प्रसिद्ध आहे. गतवर्षी मिरचीला चांगले भाव मिळाले. या हंगामात सुरुवातीला मिळालेला १५ ते १८ रुपये प्रतिकिलो भाव होते. आता मात्र, ६ ते १० रुपोच दर मिळत आहे. तोडणीचाही खर्च प्रतिकिलो ६ रुपये, बाजारात विक्रीसाठी नेण्याचा खर्च १ रुपया येतो. शेतकऱ्यांच्या हाती २ ते ३ रुपये पडत आहे. महागडी कीटकनाशके, खते व इतर उत्पादनखर्च काढल्याने सर्व काही उणे होते.
सरकारने ४३ टक्के आयात कर लादल्याने १० रुपये खरेदीचा माल त्यांना खर्चसाह ६५ रुपये पडतो, असे राजुराबाजार येथील खरेदीदार सचिन आंडे यांनी सांगितले. शिवाय इंधनवाढीमुळे वाहतूकखर्च वाढला आहे. कोरोनाकाळात मिर्चीसह सर्वच भाजीपाला पिकावर संकट आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात मिरची ६ ते ७ रुपये दराने व्यापाऱ्यांना मिळत असल्याने ते तिकडे वळले आहे. मोर्शी बाजारात राजुराबाजारपेक्षा कमी भाव मिळतो आहे. १५ आगस्टपासून राजुरा मार्केट सुरू झाले आहे. १० ते १५ रुपयात व्यापार सुरू आहे. १३ सप्टेंबरला १२ ते १४ रुपये भाव मिळाला.
बॉक्स
रेल्वे मालवाहतूक सुरू होणे आवश्यक
राजुराबाजार मिरचीचे मोठ्ठे मार्केट आहे. यामुळे वरूड येथे रेल्वे मालवाहतूक सोय होणे वाहतूक खर्च बचतीसाठी आवश्यक आहे. आगामी काळात थेट राजुराबाजार येथूनच रेल्वे मालधक्का करण्याची शेतकऱ्याची मागणी आहे. मिरचीला ३० ते ३५ रुपये भाव मिळाल्यास उत्पादन खर्च निघतो. त्यासाठीे मिरची उत्पादकाला राजकीय पाठबळ आवश्यक आहे, असे मत शेतकरी सुनील बुरंगे यांनी व्यक्त केले.
यावर्षी बांग्लादेश सरकारने मिरचीवर आयात कर वाढविल्याने तेथील व्यापारी उतरले नाही. वाहतूक खर्चही वाढला आहे. तो विचार करून देशात इतर राज्यात माल जातो. परिणामी बाजारात चैतन्य नाही.
- सचिन आंडे
मिरची व्यापारी, राजुराबाजार