लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : गुन्हेगारांच्या दोन गटांतील जुन्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा पेन्शनपुरा येथील नवरंग दुर्गा मंडळाच्या मागे मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास खून करण्यात आला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. सदर प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून, दोघे पसार आहेत.सल्लू ऊर्फ सय्यद सलीम ऊर्फ सलमान सय्यद रहमान (२८, रा. आझादनगर, परतवाडा) असे मृताचे नाव आहे. त्याचा भाऊ सय्यद इम्रान सय्यद रहमान (२१, रा. आझादनगर) यांच्या फिर्यादीवरून परतवाडा पोलिसांनी दीपक ऊर्फ झांशी शंकर कुंबलेले (२८, रा. पेन्शनपुरा, परतवाडा) याला अटक केली. लल्ला ठाकूर (रा. रविनगर, परतवाडा) व पवन नामक दोन्ही आरोपी पसार आहेत. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सल्लू हा मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान रस्त्याने जात असताना तिन्ही आरोपींनी सशस्त्र हल्ला चढविला. एकाने हात धरले व दुसऱ्याने हल्ला करण्याची चिथावणी दिली, तर दीपक ऊर्फ झांशी कुंबलेले याने लोखंडी कत्ता डोक्यावर मारून सल्लूला संपविले. हल्लेखोर व मृत सल्लू यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत. काही महिन्यांपूर्वी सल्लू व झांसी यांच्यात वाद झाला होता यातून सल्लूने झांसीवर जीवघेणा हल्ला करून जखमी केले होते. त्याचाच वचपा काढण्यासाठी खून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.हत्येची माहिती शहरात पसरताच एकच खळबळ उडाली होती. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह परिजनांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी ३ वाजता सल्लूच्या मृतदेहावर चोख पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, परतवाडा पोलिसांनी आरोपी झांशीला बुधवारी सायंकाळी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केल्याचे न्यायालयीन सूत्रांनी सांगितले.खूनप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. दोघांचा शोध सुरू आहे. शहरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरिकांनी कुठल्याच अफवांवर विश्वास न ठेवता संयम ठेवावा.- संजय सोळंके,ठाणेदार, परतवाडा
परतवाड्यात युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:02 PM
गुन्हेगारांच्या दोन गटांतील जुन्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा पेन्शनपुरा येथील नवरंग दुर्गा मंडळाच्या मागे मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास खून करण्यात आला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. सदर प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून, दोघे पसार आहेत.
ठळक मुद्देमंगळवार भांडणाचा वचपा