परतवाडा : अचलपूरच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अचलपूर तहसीलदार कोरोना संक्रमित निघाले आहेत. अचलपूर नगरपालिकेतील कार्यालयीन अधिक्षक, अभियंता, आणि अचलपूरचे नोडल ऑफिसरही कोरोना संक्रमित आहेत.
तर परतवाडा शहराला लागून असलेल्या कांडली व देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत अवघ्या दहा दिवसात ५० चे वर कोरोना रुग्ण निघाले आहेत. ही दोन्ही गावे प्रशासनाच्या आदेशान्वये सील केली असली तरी दररोज या ग्रामपंचायत क्षेत्रात नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. यातच परतवाडा शहरात १५९ तर अचलपूर शहरात १६५ कोरोना रुग्ण मागील दहा दिवसात निघाले आहेत. यात संतोष नगर, सिविल लाईन, गुरुनानक नगर मिळून ३९, विदर्भ मिल परिसरात ३४ , घामोडीया प्लॉट, खापर्डे प्लॉट, तांबे नगर मिळून २०, नबाब मार्केट, सैलानी प्लॉट, पेन्शनपुरा मिळून १९, सदर बाजारातील ११, अचलपूर शहरातील विलायतपुरा २४, अब्बासपुरा १८ ,सरमसपुरा १७, महिराबपुरा १४, बिलनपुरा येथील ११ रुग्णांचा समावेश आहे.
शासन निर्देशानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक कोरोना रुग्ण असलेले क्षेत्र कोरोनाचे हॉट स्पॉट ठरते. यानुसार अचलपूर व परतवाडा शहरासह अख्खा तालुकाच कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारादरम्यान मृत्यूचे प्रमाणही तालुक्यात लक्षवेधक आहे. कोविड रुग्णालयात किंवा कोविड सेंटरला बेड उपलब्ध नसल्यामुळे औषधोपचारपासून ते वंचित आहेत.घरात तसेच पडून आहेत. यातच कोवाड सेंटरलाही औषध उपलब्ध नाही. यामुळे एकंदरीत तालुक्यातील चित्र भयावह असून प्रशासनासह शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.