फोटो पी ११ चांदूरबाजार
चांदूर बाजार : कठोर संचारबंदीचा आदेश झुगारत अनेक नागरिक रस्त्यावर येत असल्याने, तर काही दुकानदार लपूनछपून व्यवसाय करीत असल्याने स्वतः प्रभारी तहसीलदार अक्षय मांडवे यांनी कारवाईची धुरा हाती घेतली. यावेळी महसूल, पोलीस व पालिका प्रशासनाने संयुक्त कारवाईत २२ प्रकरणाध्ये २२ हजार ४०० रुपये दंड वसूल केला.
अनेक नागरिक कोरोना रुग्णवाढीबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. त्यात चांदूर बाजार तालुक्यातील शहर भागात संचारबंदीची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नव्हती. अशीच परिस्थिती ही ग्रामीण भागातदेखील पाहायला मिळत आहे. यामुळे ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याची गंभीर दखल घेत प्रभारी तहसीलदार अक्षय मांडवे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्या तसेच नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध धडक कारवाईला सुरुवात केली आहे. कारवाईत चांदूर बाजारचे ठाणेदार सुनील किनगे, नगर परिषदचे आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच तहसील कार्यालयाचे कर्मचारीदेखील होते. तालुका प्रशासनाचा या कारवाईनंतर विनाकारण फिरणारे नागरिक काही वेळकरिता दिसेनासे झाले होते.
बॉक्स
ग्रामीण भागात व्हावी कारवाई
ग्रामीण भागात कारवाईसाठी गटविकास अधिकारी यांचे पथकदेखील यासाठी कार्यान्वित करण्यात आले. पथकाने सात प्रकरणांमध्ये २१०० रुपयांचा दंड वसूल केला. संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाईची गती वाढविण्याची मागणी होत आहे.