अमरावती : राज्यात मध्यवर्ती व जिल्हा कारागृहात टेलिफोनिक सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मुलाखतीसाठी बंदी पात्र असलेल्यांना आठवड्यातून दोनदा रक्ताच्या नातेवाइकांशी टेलिफोनद्वारे संवाद साधता येणार आहे. त्याकरिता कारागृहात स्वतंत्र सुविधा असणार आहे. कैद्यांना टेलिफोनिक सुविधांसाठी काही अटी, शर्ती घालण्यात आल्या आहेत.
कारागृह व सुधार सेवा अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी कैद्यांच्या दूरध्वनी सुविधांमध्ये वाढ केली आहे. कारागृहात मुलाखतीसाठी बंदी पात्र आहेत, अशा कैद्यांचे पोलिस पडताळणी अहवाल पोलिस विभागाकडून मागविले जातात. परंतु, हे अहवाल प्राप्त होण्यास विलंब लागतो. परिणामी कैद्यांचा नातेवाइकांशी संपर्क होत नसून, त्यांची मानसिक स्थिती खालावत जाते. या सर्व प्रकारात सुसूत्रता आणण्याकरिता अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी ८ मे २०२३ रोजी कारागृह अधीक्षकांना परिपत्रक जारी केले. जे बंदी कारागृहात मुलाखतीसाठी पात्र आहेत, अशा बंद्यांना मोबाइल अथवा दूरध्वनीद्वारे त्यांच्या कुटुंबीयांशी मुलाखत द्यावयाची असेल किंबहुना ज्या मोबाइल किंवा दूरध्वनी क्रमांकावर कॉल करावयाचा आहे, तो दूरध्वनी क्रमांक संबंधित कुटुंबीयांच्या नावे असल्यास बिलाची पावती कारागृह प्रशासनाने मागवून घ्यावी आणि खात्री करून घ्यावी. अशावेळी पोलिस पडताळणी अहवालाची आवश्यकता असणार नाही, ही बाब कारागृह अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी स्पष्ट केली आहे.
कारागृहात बंद्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा योग्य वापर व्हावा. बंदी आणि नातेवाईक यांच्यामधील सुसंवाद वाढीस लागावा. यातून कारागृह प्रशासनाबद्दल आपुलकीची भावना निश्चित निर्माण होईल. बंदी सुधारणा आणि पुनर्वसन या ब्रीद वाक्याला अनुसरून त्यांचे कुटुंबीयांशी असलेले नाते अजून सृदृढ होईल.
- अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलिस महासंचालक, कारागृह प्रशासन