लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शासनाने कोरोना संसर्ग रोखण्याकरिता लसीकरणावर भर दिला असला तरी त्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक केले. यामुळे ग्रामीण भागात लसीकरणाला खीळ बसली आहे. त्याऐवजी सुटसुटीत, समजणारी सुविधा हवी, अशी मागणी होत आहे.लसीकरण प्रक्रिया राबविताना केंद्र व राज्य सरकारने नागरिकांना ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया ग्रामीण भागात विविध समस्यांमुळे पूर्ण होत नाही. जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले. कोरोनाचा दुसऱ्या लाटेत शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात शिरकाव वाढला. त्यामुळे ग्रामीण भागातही आता लसीकरणाकडे नागरिकांचा ओढा वाढतांना दिसत आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकरी, शेतमजुरांकडे मोबाईल नाही, तर कुणाकडे मोबाईल असला तरी त्यांना ऑनलाईनची प्रक्रिया कळत नाही. परिणामी लसीकरणासाठी नोंदणी करणे ग्रामीण भागात शक्य होत नाही.ग्रामीण भागासाठी लसीकरणाची प्रक्रिया सर्वसामान्यांना समजेल अशी करावी किंवा लसीकरण केंद्रावरच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, मेळघाटात नेटवर्कची अडचण आहे. त्यामुळे दुर्गम गावात नोंदणी अशक्यच आहे.