ठळक मुद्देमहापालिका आयुक्त : 'संस्काराचे मोती' स्पर्धेचे ‘पोदार इंटरनशॅनल स्कूल’मध्ये शानदार उद्घाटन
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: आई-बाबांना सांगा, यापुढे प्लास्टिकची कॅरीबॅग मुळीच वापरू नका. त्यांनी ती वापरलीच, तर तुम्ही त्यांना ती वापरू देऊ नका, असे आवाहन महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना केले नि विद्यार्थ्यांनीही बुलंद आवाजात तसे अभिवचन आयुक्तांना दिले.वाचनसंस्कृतीतून बालमनावर संस्कार बिंबविणाऱ्या 'संस्कारांचे मोती' या 'लोकमत'च्या बहुप्रतीक्षित उपक्रमाचे शानदार उद्घाटन सोमवारी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात पार पडले. त्यावेळी अध्यक्षस्थानाहून बोलताना निपाणे यांनी विद्यार्थ्यांकडून पर्यावरण जपण्याचे हे वचन घेतले. वैशिष्ट्य असे की, 'लोकमत'चा हा उपक्रम यंदा पर्यावरण या विषयाला समर्पित आहे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनीही 'ग्लोबल वॉर्मिंग'चा धोका विद्यार्थ्यांपुढे सोप्या शब्दांत विशद करून, पर्यावरण हा त्यावर कसा रामबाण उपाय ठरला आहे, याबाबतचे प्रभावी मार्गदर्शन केले. झाडे लावण्यासाठीची प्रेरणा विद्यार्थ्यांना त्यांच्या सुबोध मार्गदर्शनातून प्राप्त झाली.पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन यांनी अमोघ वाणीतून विद्यार्थ्यांमध्ये चेतना जागविली. 'संस्कारांचे मोती' या उपक्रमाचे मनापासून कौतुक करताना 'लोकमत'च्या माध्यमातून पोदार इंटरनॅशनल स्कूलचे दोन विद्यार्थी 'हवाई सफरी'चे मानकरी ठरले आणि देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील तसेच लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याशी भेटण्याची संधी त्यांना प्राप्त होऊ शकली, असे गौरोद्गार त्यांनी काढले. 'लोकमत'चे संपादकीय प्रमुख गणेश देशमुख यांनी 'संस्कारांचे मोती' या उपक्रमाचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्व विशद केले. 'लोकमत'चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे यावेळी मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत शिक्षिका रोशनी दर्जी यांनी सुरेख गीत सादर केले. शिक्षिका नयना दापूरकर यांनी सरस्वती वंदना सादर केली. संचालन शिक्षिका वृषाली भगतानी यांनी, तर आभार 'लोकमत'च्या वितरण विभागाचे सहायक व्यवस्थापक रवि खांडे यांनी व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.'संस्कारांचे मोती' या स्पर्धेचे उद्घाटन करताना महापालिका आयुक्त संजय निपाणे, जि.प. शिक्षण सभापती जयंत देशमुख, प्राचार्य सुधीर महाजन, 'लोकमत'चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे आणि संपादकीय प्रमुख गणेश देशमुख. (छायाचित्र : मनीष तसरे)'आई-बाबांना सांगा, प्लास्टिक बॅग वापरू नका'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:18 PM