अमरावती/चिखलदरा : अचानक आलेल्या थंडीच्या लाटेने विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळासह परिसरात पारा कमालीचा घसरला आहे.
मंगळवारी सकाळी ७ वाजता सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी चिखलदरा येथे झाली, तर परिसरातील माखला व बरमासत्ती परिसरात ६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्याचे तापमान ७.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. गेल्या १२ वर्षांचा रेकार्ड ब्रेक झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळ सह मेळघाट पूर्णता गारठला आहे. कुडकुडत्या थंडीचा बचाव करण्यासाठी नागरिक घराबाहेर निघताना गरम कपडे अंगावर चढवित आहेत. दिवसाही शेकोट्या पेटविल्या जात आहेत. आदिवासी नागरिक थंडीपासून बचावासाठी चुलीजवळ आश्रय घेत आहेत. चार दिवसांपासून अचानक थंडी वाढल्याने अंगात हुडहुडी भरली आहे. पर्यटनस्थळावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही आठवड्यात घट झाली आहे
माखला, बरमासत्तीत ६.८
चिखलदरा पर्यटनस्थळावर दोन दिवसांपासून पहाटे सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परतवाडा मार्गावर आलाडोह गावानजीक तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बरमासत्ती व सेमाडोहनजीकच्या उंच भागावर असलेल्या माखला गावात सर्वात कमी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बरमासत्ती भागातून भीमकुंड येथील धबधबा कोसळतो. अनेकदा येथे पहाटे चारच्या सुमारास दवबिंदू गोठल्याचे दिसून आले आहे.
अमरावती शहरात सर्वात कमी तापमान मंगळवारी ७.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सोमवारी तापमान ८ अंशावर होते. ते आणखी खाली आल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी झाले आहे. सायंकाळी ४ वाजताच थंडीची हुडहुडी जाणवत असल्याचा अमरावतीकरांचा अनुभव आहे. कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहिले. आणखी काही दिवस किमान तापमान स्थिर राहणार आहे.