अमरावती : नागपूर हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न, समस्या सुटाव्यात, असे अपेक्षित आहे. मात्र, अधिवेशन केवळ १० दिवस चालेल, असे जाहीर करण्यात आले. सरकार राज्य चालविण्यास अपयशी ठरल्याचेच हे द्योतक असल्याची परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी येथे केलीे. अमरावती विभागीय काँग्रेस पदाधिका-यांच्या बैठकीला आले असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. खा. चव्हाण यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक, सामान्य माणूस हतबल झाला आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज, दरदिवसाला नवीन जीआर, सोयाबीन व कापूस खरेदीत गोंधळ, भारनियमन, आयटीत घोळ अन् सचिवांची बदली, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असे एक ना अनेक समस्या, प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य शासनाने गत तीन वर्षांत काय केले, याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेसने भव्य मोर्चाचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुरोगामी विचारसरणीचे पक्ष या मोर्चात सामील होणार असून, गुलाम नबी आझाद त्याचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चाचे राहुल गांधींना निमंत्रण देण्यात आले आहे; परंतु ते गुजरात विधानसभा निवडणुकीत व्यस्त आहेत. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विरोधक गोंधळ घालतात म्हणून हिवाळी अधिवेशन १० दिवस चालेल, असे जाहीर केले. अधिवेशनात प्रश्न मांडणे म्हणजे गोंधळ घालणे नव्हे. भाजप विरोधात असताना त्यांनी नेमके काय केले, असा सवाल खा. चव्हाणांनी उपस्थित केला. खरे तर भाजपला राज्य सरकार चालविता येत नाही. तीन वर्षांतच बट्ट्याबोळ झाला. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. याबाबत अधिवेशनात ठोस आश्वासन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, अधिवेशन किमान तीन आठवडे न चालविता अल्पावधीत चालविणे ही सरकारची पळपुटी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आदी उपस्थित होते.
राहुल गांधींची अध्यक्षपदी निवड लोकशाही मार्गानेचराहुल गांधी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड ही घराणेशाही असल्याचा आरोप भाजपचे शाहनवाज हुसेन यांनी केला आहे. त्यावर खा. अशोक चव्हाण म्हणाले, राहुल गांधी यांची लोकशाही मार्गानेच अध्यक्षपदी निवड होणार आहे. ज्यांना कुणाला काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान व्हायचे असेल, त्यांनी लोकशाही प्रक्रियेतून पुढे यावे. तसेही शाहनवाज हुसेन यांचा काँग्रेसशी काय संबंध? त्यांनी ‘पब्लिसीटी’साठी हा मुद्दा उपस्थित केला आहे.
... म्हणून तर पंतप्रधानांना ५० सभा घ्याव्या लागतातगुजरातमध्ये लोकांना बदल हवा असून, राहुल गांधीच्या प्रचारसभांना प्रचंड गर्दी होत आहे. गुजरात जर भाजपचा गड आहे, तर विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५० सभा का घ्याव्या लागतात, हादेखील प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री येथे ठिय्या मांडून असल्याची टीका त्यांनी केली.