गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युक्रेनची सीमा पार करून रोमानियात प्रवेश करण्याचे तब्बल दहा तास हा काळ मृत्यूचा थरार होता. सीमेवर एकच गर्दी, अनेक देशांतील नागरिकांचा गोंधळ, उणे सात अंश तापमान, बसायलाही जागा नाही, खायला, प्यायला काहीच नाही. एकमेकांच्या अंगावर बसलो. त्यातच गोंधळामुळे गोळीबारही झाला, काही जण जखमी झाले. क्षणभर वाटले, संपले सारे. एकमेकांना धीर दिला. देवाची कृपा, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि सर्वांच्या प्रेमामुळे सुखरूप परतल्याची आपबीती युक्रेनवरून जिल्ह्यात परतलेल्या स्वराज पुंड याने ‘लोकमत’ला सांगितली. युक्रेनच्या व्हिनितसिया नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी (व्हीएनएमयू) मध्ये स्वराज शिक्षण घेत आहे. हे शहर युक्रेनची राजधानी कीव्हपासून सुमारे ५०० किमी अंतरावर आहे. युक्रेनमधून २४ ला पहिले विमान भारतीयांच्या सुटकेसाठी उडाले. आम्ही राहतो ते होस्टेल तसे सेफ; परंतु २४ तारखेला होस्टेलपासून पाच किमी अंतरावरील केमिकल फॅक्टरीवर बॉम्ब टाकण्यात आला. त्यानंतर सर्व विमानतळे बंद करण्यात आली. आमच्या इमारतीखाली तात्पुरते बंकर तयार करण्यात आले होते. त्यामध्ये आम्ही २६ पर्यंत राहिलो. खाण्या-पिण्याची फारशी सुविधा नव्हती. आमच्या जवळ जे काही होते, त्यावरच दोन दिवस काढल्याचे स्वराज याने सांगितले.आम्ही दहा जणांनी मिळून बस केली व रोमानिया सीमेच्या आठ किमी अलीकडे उतरलो. तेथून पुढे पायवाटेने जावे लागले. वरून बर्फवृष्टी सुरू होती. जमिनीवरही बर्फ होता. अशा परिस्थितीत एकमेकांना धीर देत युक्रेनची सीमा गाठली व या दहा तासांच्या जीवघेण्या अनुभवानंतर रोमानियात सेफ झाल्याचे स्वराज म्हणाला.
सीमापारसाठी दहा जणांनी शेअर केली बसयुक्रेनमधून रोमानियाच्या सीमेवर जाण्यासाठी दूतावासाचे सहकार्य मिळाले नाही. दहा जणांनी मिळून बस भाड्याने घेतली. आठ तासांचा बस प्रवास व सहा तास पायी चालून आम्ही रोमानिया सीमेवर पोहोचलो. तिथे आधीच गर्दी असल्याने सीमापार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, असे स्वराज म्हणाला.
सीमेवर गोळीबार, नायजेरियन जखमीयुक्रेनच्या सीमेवर आफ्रिकन देशाचे अनेक नागरिक होते. त्यांच्यात सीमापार करण्यासाठी गोंधळ झाला. त्यामुळे हवेत गोळीबार करण्यात आला. यामध्ये नायजेरियन तरुणाच्या पायाला गोळी लागली, तिथे पळापळही झाली. मी मागे फिरलो अन् ग्रुप विस्कळीत झाला. या गोंधळात अनेकांचे सामान फुटले, तुटले, कपडे फाडल्याचे त्याने सांगितले.
तीन प्रसंगी वाटले - वाचणार नाहीआठ दिवसांच्या काळात ज्यावेळी शहरावर अटॅक झाला, त्यानंतर बंकरमध्ये राहावे लागले व बाॅर्डर पार करण्याच्या वेळी गोळीबार, पळापळ या तीन प्रसंगी मी रडलो. कदाचित आपण वाचणार नाही, असे वाटले. संकटातून निघण्याची मानसिकता केली व आता घरी पोहोचल्याचे स्वराज म्हणाला.
ट्रांझिट व्हिसा पहिल्यास प्राधान्य
- रोमानियात आम्हाला ट्रांझिट व्हिसा देण्यात आला. येथे स्थानिक एनजीओंनी कॅम्प लावले होते. तिथे चांगली व्यवस्था झाली, ‘ऑपरेशन गंगा’सुरु झाल्याने भारताचे विमान आले. त्यामध्ये जे अगोदर पोहोचले त्यांना प्रवेश देण्यात आला.