लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : तालुक्यातील टाकरखेडा मोरे येथील संत गुलाबबाबा मंदिरातील चोरीप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोन सराईत चोरांना अटक केली आहे. त्यांनी टाकरखेडा मोरे येथील चोरीसह अन्य एका घरफोडीची कबुली दिली आहे. आरोपींकडून १२ लाख ७० हजार ६२० रुपये किमतीची चांदी जप्त करण्यात आली आहे. शेख आरिफ ऊर्फ काला आरीफ शेख हारून (३५, अंजनगाव सुर्जी) व सलीम खाँ नईम खाँ (२६, कोकाटखेल, ता. अंजनगाव सुर्जी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. टाकरखेडा मोरे येथील संत गुलाबबाबा मंदिरातून २२ किलो ७० ग्रॅम वजनाची चांदीची चादर, छत्री, पादुका व पत्रा असा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत गोपाल उमक यांनी २८ जानेवारी रोजी अंजनगाव पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्याअनुषंगाने या चोरीचा तपास करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेला दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक आशिष चौधरी, किशोर मोतिंगे व त्यांचे पथक अंजनगाव हद्दीत मालमत्तेसंबंधी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना, टाकरखेडा मोरे येथील मंदिरातील चोरीचा आरोपी दत्तघाट परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून ४ डिसेंबर रोजी आरोपी काला आरीफ व सलीम खाँ यांना दत्तघाट परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही आरोपींनी गुलाबबाबा मंदिरात दोनदा चोरी केल्याची कबुली दिली. त्यासोबतच आरोपी शेख आरीफ याने अंजनगाव सुर्जीतील सायराबानो मो. रहमान यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. संत गुलाबबाबा मंदिरातील १२ लाख ७० हजार रुपये किमतीची २ किलो १७७ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. शेख आरीफ हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याने घरफोडी व चोरीचे गुन्हे केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तपन कोल्हे व अंजनगावचे ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी एलसीबी पथकाने केली.
११ महिन्यांनंतर मिळाले आरोपीटाकरखेडा मोरे येथील संत गुलाबबाबा मंदिरस्थळी हजारो भाविक श्रद्धेने नतमस्तक होत असतात. त्याच मंदिरातून तब्बल २२ किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलीस तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तथापि, ११ महिन्यानंतर का होईना, पोलिसांना चांदीचोर पकडण्यात यश आले.