धनंजय धांडे लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : स्थानिक पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गट शिक्षणाधिकाऱ्यासह अनेक पद रिक्त आहेत. प्रभारीराज असल्याने या महत्त्वाच्या विभागाचे तीनतेरा वाजल्याचे वास्तव चित्र आहे. परिणामी, कार्यरत कर्मचाऱ्यांना कामाचा भार वाहून न्यावा लागत आहे. केंद्रप्रमुखांच्या दहाही जागा रिक्त असून नऊ शिक्षक १० केंद्रांचा गाडा हाकत आहेत.दर्यापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत १० केंद्रे येतात. यात १२८ शाळांचा समावेश आहे. १० केंद्रप्रमुख असणाऱ्या पंचायत समितीत आता नऊ शिक्षकांकडे अतिरिक्त प्रभार असून ते केंद्रप्रमुखांचा कारभार पाहत आहेत. यापैकी एका शिक्षकाकडे सामदा व रामतीर्थ असा दोन ठिकाणचा भार आहे. १० केद्रांमध्ये थिलोरी, इटकी, शिंगणापूर, चंडिकापूर, सांगवा, दर्यापूर, येवदा, सामदा, रामतीर्थ, वरूड कु. यांसारखी मोठी गावे आहेत. येथील शिक्षण विभाग आजवर प्रभारीच राहिल्याचे वास्तव आहे. मागील वर्षभरापासून भातकुली येथील विस्तार अधिकारी वीरेंद्र तराळ हे दर्यापूर पंचायत समितीत प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यामुळे शिक्षण विभागात कामकाजावर परिणाम होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शासन स्तरावरून उपाययोजना केल्या जात असल्या तरी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची पदे भरल्याशिवाय यात बदल होणे शक्य नाही. याला शासनाचे धोरणच कारणीभूत असल्याचे वर्तुळातून बोलले जात आहे.
एक विस्तार अधिकाऱ्याकडे १२८ शाळा दर्यापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात विस्तार अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक विस्तार अधिकारी कार्यरत असून दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे एक विस्तार अधिकाऱ्याकडे १० केंद्रे व १२८ शाळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत शिक्षण विभागाला संपूर्णत: रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.
शिक्षण विभागात केंद्रप्रमुखांसह अनेक पदे रिक्तच आहेत. महत्त्वाचीच पदे रिक्त असल्याने साहजिकच माझ्यासह इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार येत आहे. मात्र, कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. रिक्त असलेली पदे लवकर भरावीत म्हणून वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. - वीरेंद्र तराळ, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, दर्यापूर पं. स.