अमरावती : महानगरपालिकेच्या महिला व बाल विकास विभागाद्वारे संचालित स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेत धडे गिरविणाऱ्या दहा विद्याथ्यांची शासकीय सेवेत निवड झाली. वैशाली तायडे, इरफान युनूस खान व प्रकाश शिंदे यांची मंत्रालय मुंबई येथे लिपिक, अक्षय याऊल, अश्विन पवार, शुभम सोनारे यांची नागपूर एसआरपीएफ, आनंद भुजबळ व प्रज्वल शेंडे यांची कुसडगाव एसआरपीएफ, कुणाल जिचकार यांची मुंबई पोलीस दलात तर स्वाती सवई यांची रेल्वेमध्ये निवड झाली.
या विद्यार्थ्यांनी सरळसेवा पद भरतीत यश प्राप्त केले. त्यांची विविध पदावर नियुक्ती झाली आहे. महिला व बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे यांनी पुढाकार घेऊन काही वर्षापूर्वी स्पर्धा परिक्षा क्षेत्रात करियर करु इच्छिणाऱ्या शहरातील गरीब, होतकरु विद्यार्थ्यांकरीता मनपाने शहराच्या मध्यभागी स्पर्धा परिक्षा ग्रंथालय, अभ्यासिकेची निर्मिती केली. तेव्हापासून शेकडो विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेवून शासकीय सेवेत विविध पदावर रुजू झालेले आहेत.
आगामी काळात अमरावती महानगरपालिकेतर्फे टेस्ट सिरीजचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे आयुक्त देविदास पवार यांनी सांगितले. यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, उपायुक्त जुम्मा प्यारेवाले यांनी पुस्तक देऊन अभिनंदन केले.