अमरावती : घरमालक वृद्धेची हत्या करून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आरोपी भाडेकरूस न्यायालयाने जन्मठेप, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जे. मोडक यांच्या न्यायालयाने २४ ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला. संतोष मोतीराम जांभुळकर (३२) रा. गाडगव्हाण, मध्यप्रदेश असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुशिला लक्ष्मणराव शेंडे (७०, रा. बॉम्बे फैल) असे या प्रकरणातील मृताचे नाव आहे.
दोषारोपपत्रानुसार, सुशिला या बॉम्बे फैल येथे एकट्याच राहत होत्या. त्यांनी स्वमालकीच्या पहिल्या मजल्यावरील दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या. घटनेच्या आधी दोन ते तीन दिवस आधीच संतोष हा त्यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहायला आला होता. घटनेच्या दिवशी ५ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता सुशिला या कपडे वाळविण्याकरिता पहिल्या मजल्यावर गेल्यावर संतोषने त्यांना आपल्या खोलीत बोलाविले. त्याने सुशिला यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांचा खून केला. त्यांच्या अंगावरचे सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर तो कपडे व अन्य साहित्याची गाठोडी बांधून तेथून निघून गेला.
जाताना सुशिला यांच्या घराच्या पायऱ्यावर बसलेल्या शेजारी जयपालसिंग सेंगर व संजीव बालवंशी यांनी त्याला हटकले. त्यावेळी त्याने घाबरलेल्या अवस्थेत कामावर जात असल्याचे सांगितले होते. दरम्यान, सायंकाळपर्यंत सुशिला कुणाला न दिसल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे जाऊन बघितले. यावेळी सुशिला या संतोषच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. या प्रकरणी सुशिला यांचा पुतण्या गजानन शेंडे (५६, रा. आनंदनगर) यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी संतोषला अटक केली.
पोलीस उपनिरिक्षकद्वयांनी केला तपास
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत नारमोड व गजानन राजमलू यांनी तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी संतोषला शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनील देशमुख यांनी युक्तीवाद केला. कोर्ट पैरवी म्हणून सुधाकर माहुरे व अरुण हटवार यांनी काम पाहिले.