अमरावती : शहरात ९३ हजार नळकनेक्शनधारक आहेत. सदर ग्राहकांच्या घरी नळाला मीटर लावण्यात आले आहे. ग्राहकाने किती पाण्याचा वापर केला, त्याचे मीटर रीडिंग घेणे तसेच त्यानंतर ग्राहकाच्या घरी दरमहिन्याला बिल पोहचविण्याकरिता एजन्सी नेमण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती कार्यालयाने ७७ लाखांची ई- निविदा काढली आहे.
ई- निविदेकरिता फक्त दोनच एजन्सी पुढे आल्या आहेत. नियमानुसार किमान तीन एजन्सीने इ-निविदा प्रक्रियेत सहभाग घेणे अनिर्वाय आहे. त्यामुळे सदर ई- निविदेचे प्रकरण कार्यकारी अभियंता यांनी अधीक्षक अभियंता कार्यालयाकडे पाठविले. त्यांच्या निर्णयानंतरच सदर ई-निविदा पुन्हा रिकॉल करायचे की कसे? यानंतर निर्णय होणार असल्याचे कार्यकारी अभियंता निवृत्त रकताडे यांनी सांगितले.
पूर्वी पाण्याच्या मीटरचे रीडिंग घेणे व ग्राहकांच्या घरी बिले पोहचविण्याचे काम ओव्हर ग्रुपला मिळाले होते. मात्र, कामाची मुदत संपल्याने नव्याने ई- निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. शहरात ९३ हजार नळग्राहक असून, त्यांना दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहराला प्रतिदिन १२१ दलघमी एवढे पाणी लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.