अमरावती : चांदुरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथे शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास दोन समुदाय परस्परांना भिडले, शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी तात्काळ परिसरात जाऊन जमावाला शांत केले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. धार्मिक स्थळसमोर वाद्य वाजविण्याच्या करणावरून ती तणावाची स्थिती निर्माण झाली.
ब्राम्हणवाडा येथे शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रॅली काढण्यात आली. ती रॅली गावातील वॉर्ड क्रमांक 1 स्थित धार्मिक स्थळासमोर आली असता तेथे उपस्थित नागरिकांनी वाद्य न वाजवण्याची विनंती केली. मात्र, ती सूचना अव्हेरल्याने दोन समुदायत चांगलाच वाद झाला. ती परिस्थिती नियंत्रणात आणून पोलीस यंत्रणा तेथून निघून गेली. दरम्यान रात्री 10 वाजता ती रॅली पुन्हा परतीच्या मार्गांवर असताना धार्मिक स्थळसमोर आली... Dj वाजत होताच... त्यामुळे पुन्हा एकदा चांगलीच गरमागरामी झाली. मात्र, तेव्हा पोलीस नसल्याने तो वाद सुमारे अर्धा तास चालला. पोलिसांनी वॉर्ड 1 मध्ये असलेल्या रॅलीमधील एक वाहन तेथेच थांबवून ठेवत गर्दी पांगवली. दरम्यान, रात्री 11.35 पर्यंत याबाबत ब्राम्हणवाडा पोलिसात कुठलीही तक्रार नोंदविली गेली नाही. मात्र, रॅलीतील काही महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी एकत्र आल्या. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांसाह मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.